प्रतिवर्षी 900 हून अधिक मुले कॅन्सरचे बळी
बेंगळूर शहरात 280 ते 300 मुले कॅन्सरग्रस्त : विविध व्यसनेच कॅन्सरसाठी ठरताहेत कारणीभूत
बेंगळूर : राज्यात प्रतिवर्षी 900 हून अधिक मुले कॅन्सरचे बळी पडत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. राज्यात वर्षभरात 975 मुलांमध्ये कॅन्सर दिसून आल्याचे किडवाई स्मारक ग्रंथी संस्थेने म्हटले आहे. यापैकी एका बेंगळूर शहरात 280 ते 300 मुले कॅन्सरग्रस्त दिसून येत आहेत. सर्व वयोगटातील व्यक्तींचा विचार केल्यास 2.7 टक्के मुले व 1.3 टक्के पुरुषात कॅन्सर दिसून येतो. कॅन्सरमध्ये विविध प्रकार आहेत. लिम्पाफाईड ल्युकेमिया (20.6 टक्के), मायलॉईड ल्युकेमिया (14.4 टक्के), मेंदू व मज्जातंतू कॅन्सर (13.8 टक्के), एनएचएल (6.5 टक्के), महिलांमध्ये लिम्फाईड ल्युकेमिया (25.5 टक्के), मेंदू व मज्जातंतूचा कॅन्सर (12.8 टक्के), मायलॉईड ल्युकेमिया (12.8 टक्के), सांध्यासंबंधीचा कॅन्सर (1.17 टक्के), अंडाशयाचा कॅन्सर (5.3 टक्के), हॅडल्नीन्स कॅन्सर (4.3 टक्के) आढळून आलेला आहे.
राज्यात मागीलवर्षी कॅन्सरची सुमारे 86,563 नवी प्रकरणे दाखल झाली होती. 2.3 लाख प्रकरणांवर चिकित्सा करण्यात आली आहे. एका बेंगळूर शहरामध्ये गतवर्षी 14,630 कॅन्सरची प्रकरणे दाखल झाली असून यामध्ये 6,650 पुरुष व 7980 महिला कॅन्सर रुग्ण दिसून आले आहेत. 9.7 टक्के पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर दिसून आला आहे. प्रोस्टेट (6.9), पोटाचा कॅन्सर (6.5), तोंडाचा कॅन्सर (6.4) तर महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर 31.5 टक्के, गर्भाशयाचा कॅन्सर 9.1, अंडाशयाचा कॅन्सर 6.4, तोंडाचा कॅन्सर 6.3, कार्पस युटेरी कॅन्सर 4.2 टक्के दिसून आला आहे. आजार बळावल्यानंतर वैद्यकीय चिकित्सा घेण्यापेक्षा आजार होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे हे महत्त्वाचे आहे. तंबाखूचे वारंवार सेवन करणे, मद्यपान, धूम्रपान यामुळे फुफ्फुस, तोंड, घसा, अन्ननलिका, पोट, आतडे, मूत्रपिंड यांना इजा होऊ शकते. त्यामुळे व्यसनापासून दूर राहिल्यासच कॅन्सर होणार नाही, असे मत किडवाई स्मारक ग्रंथी संस्थेने व्यक्त केले आहे.
वर्षभरात सुमारे 22 हजार नवी प्रकरणे दाखल
राज्यातील कॅन्सरचे प्रसिद्ध उपचार केंद्र म्हणून किडवाई स्मारक ग्रंथी रुग्णालयाचा उल्लेख करता येईल. या रुग्णालयात राष्ट्रीय कॅन्सर दिन प्रतिवर्षी 7 नोव्हेंबरला साजरा करण्यात येत असतो. या दिनाच्या निमित्ताने मुलांच्या कॅन्सरवर कार्यशाळा होत असते. या रुग्णालयात वर्षभरात सुमारे 22 हजार नवी प्रकरणे दाखल होत असतात.