74 हजारहून अधिक चार्जिंग केंद्रे देशात स्थापणार
22 हजार केंद्रे बससाठी : विविध शहरांत विस्तार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासोबतच चार्जिंग सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यासाठी सरकारने निर्देश दिले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग करिता देशभरामध्ये 74,300 चार्जिंग केंद्रे स्थापन करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत.
बससह विविध वाहनांकरीता केंद्रे
इलेक्ट्रिक वाहन सार्वजनिक चार्जिंग केंद्रांच्या स्थापनेला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याची सरकारची तयारी सुरू आहे. एकंदर 74,300 चार्जिंग केंद्रे उभारण्याची तयारी सरकारने केलेली असून यामध्ये इलेक्ट्रिक कारसाठी 22 हजार 105 फास्ट चार्जर आणि 1800 इलेक्ट्रिक बससाठी फास्ट चार्जिंग केंद्रांची सोय करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त दुचाकी आणि तिचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगकरिता 48 हजार 400 फास्ट चार्जर केंद्रांची स्थापना केली जाणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी केंद्रे
इलेक्ट्रिक वाहन सार्वजनिक चार्जिंग केंद्रांकरिता अंदाजे 2 हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याचे समजते. खासगी पार्किंग स्थळ आणि कार्यालय भवन, शैक्षणिक संस्था आणि सहकारी सोसायटी याठिकाणी चार्जिंग केंद्रे स्थापन करण्याची योजना सरकारने तयार केली आहे. यासोबतच सार्वजनिक चार्जिंग केंद्रांबाबत विचार करता रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप, विमानतळ, मेट्रो स्टेशन, शॉपिंग मॉल, नगरपालिका वा महानगरपालिकेचे पार्किंग स्थळ, महामार्ग अशा ठिकाणी सुद्धा चार्जिंग केंद्रे आगामी काळात उभारली जाणार आहेत.