कराची मॉलमधील आगीत 60 हून अधिक बेपत्ता
वृत्तसंस्था/ कराची
कराचीतील ऐतिहासिक गुल प्लाझा शॉपिंग सेंटरमध्ये रविवारी मध्यरात्री उशिरा भीषण आग लागल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. पोलीस प्रमुख जावेद आलम ओढो यांनी या आगीत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच सुमारे 60 लोक अद्याप बेपत्ता असून शोधकार्य सुरू आहे. आगीत होरपळलेल्या 18 जखमींना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, मात्र अजूनही कित्येक जणांवर उपचार सुरू असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.
मॉलमधील आगीत अनेक व्यापाऱ्यांची आयुष्यभराची कमाई आणि 20 वर्षांची मेहनत रातोरात राख झाली आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले मॉल फुटबॉल मैदानापेक्षा मोठ्या भागात पसरलेला असून त्यात सुमारे 1,200 दुकाने आहेत. प्रत्यक्षदर्शी आणि व्हिडिओ फुटेजनुसार, इमारतीतून उंच ज्वाळा उठताना दिसत होत्या. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला रात्रभर प्रचंड मेहनत घ्यावी लागली. अजूनही बचाव पथकांनी ढिगारा साफ करणे आणि इमारती थंड करण्याची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. शोधकार्य पूर्ण करण्यासाठी कोणतीही निश्चित मुदत दिली जाऊ शकत नाही, असे पोलीस आणि अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
प्राथमिक तपासानुसार सर्किट ब्रेकरमधील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे दिसून येत आहे. पोलीस प्रमुख ओधो यांच्या म्हणण्यानुसार, मॉलची रचना आणि आतील साहित्य, कार्पेट्स, ब्लँकेट्स आणि राळापासून बनवलेल्या वस्तूंमुळे आग अधिक वेगाने पसरण्यास मदत झाली. मॉलच्या आत वेंटिलेशनची कमतरता असल्यामुळे मॉलच्या आतील भागात दाट काळा धूर पसरला होता. अंतर्गत जटील रचनेमुळे मॉलमध्ये अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे आणि बचावकार्य करणे कठीण झाले होते.
गुल प्लाझामधील ही आग 2012 मधील कराचीतील औद्योगिक वसाहतीला लागलेल्या आगीनंतरची सर्वात भीषण घटना मानली जाते. 2012 मध्ये एका औद्योगिक साइटला लागलेल्या आगीत 260 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.