आसाममध्ये पूरामुळे 6 लाखाहून अधिक जण प्रभावित
45 जणांचा मृत्यू : मिझोरमध्ये भूस्खलन, 3 ठार : गुजरातच्या जूनागढमध्ये शाळा-महाविद्यालये बंद
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाममध्ये सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसंकट निर्माण झाले आहे. 19 जिल्ह्यांमधील 6.44 लाखाहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. पूरामुळे आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. आसाम आणि अरुणाचल प्रदेशात मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. ब्रह्मपुत्रा, सुबनसिरी, दिखौ, दिसांग, बुरहिदिहिंग, जिया-भराली, बेकी आणि कुशियारा नदीच्या पात्राने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मागील 24 तासांमध्ये पूरामुळे 44 रस्ते, एक पूल आणि 6 बंधारे वाहून गेले आहेत.
मिझोरमच्या आयजोलमध्ये मंगळवारी भूस्खलनामुळे 4 वर्षीय मुलीसमवेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वजण घरात झोपलेले असताना भूस्खलनामुळे इमारत जमीनदोस्त झाली. यादरम्यान घरातील काही सदस्यांनी तेथून बाहेर पडत स्वत:चा जीव वाचविला, परंतु एक जोडपे आणि त्यांची मुलगी ढिगाऱ्याखाली सापडली.
गुजरातमध्ये मागील 24 तासांदरम्यान पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. जूनागढ जिल्ह्यातील वंथलीमध्ये 14 इंच तर विसावदरमध्ये 13 इंच पावसाची नोंद झाली आहे. जूनागढमध्ये पाणी साचल्याने सर्व शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली. तर दोन राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक रोखण्यात आली आहे.
अनेक भागांचा संपर्क तुटला
आसाममध्ये पूरस्थिती बिकट होत चालली आहे. पाण्याची पातळी वाढल्याने काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पातील 233 वनशिबिरांपैकी 26 टक्क्यांहून अधिक भाग जलमग्न झाला आहे. तर भारत-चीन सीमेवर देखील अनेक भागांचा रस्तेसंपर्क तुटला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानुसार पूरग्रस्त जिल्ह्यांची संख्या 12 वरून वाढत 19 झाली आहे. ईटानगरमध्ये मुसळधार पावसामुळे 6 जुलैपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
कुरुंग नदीवरील पूल नष्ट
पूर्व कामेंग जिल्ह्यात कुरुंग नदीवरील पूल पुरात वाहून गेला आहे. तसेच अनेक घरे देखील पुराच्या पाण्यात सापडली आहेत. आसाममध्ये सुमारे 8 हजार लोकांना मदतशिबिरांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. तर तिनसुकिया जिल्ह्यात सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. काझीरंगा वन्यजीव अभयारण्याचा मोठा हिस्सा पाण्यात बुडाला असून मोठ्या संख्येत प्राणी उंच ठिकाणाच्या शोधात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-715 ओलांडून पूर्व कार्बी आंगलोंग जिल्ह्याच्या दक्षिण हिस्स्याच्या दिशेने प्रवास करत आहेत. परंतु पूर किंवा रस्ता ओलांडताना कुठल्याही प्राण्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.
राज्यातील किमान 8 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून यात ब्रह्मपुत्रा नदीने जोरहाट जिल्ह्यातील नेमाटीघाटमध्ये स्वत:ची सर्वोच्च पातळी ओलांडली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, सैन्य, वायुदल आणि स्थानिक प्रशासनासमवेत अनेक यंत्रणा बचावकार्यात सामील झाल्या आहेत. एकूण 6 लाख 44 हजार 128 जण पूरामुळे प्रभावित झाले आहेत. कामरुप, गोलाघाट, माजुली, लखीमपूर, करीमगंज, कछार, धेमाजी, मोरीगांव, उदलगुडी, डिब्रूगढ, तिनसुकिया, नागांव, शिवसागर, दारंग, नलबाडी, सोनितपूर, तामुलपूर, विश्वनाथ, जोरहाट हे भाग पूरसंकटामुळे बेहाल झाले आहेत.