4 हजारांहून अधिक व्यावसायिक विनापरवाना
महानगरपालिका आयुक्तांकडून बाजारपेठेत पाहणी : आरोग्य निरीक्षकांना बजावली कारणे दाखवा नोटीस
बेळगाव : बाजारपेठेतील सुमारे 4 हजारांहून अधिक व्यावसायिकांनी मनपाकडून व्यापार परवाना घेतलेला नाही. तर घेतलेल्यांनी त्याचे नूतनीकरण केलेले नाही. काही व्यावसायिकांनी विनाकारण सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमईएस) परवाना घेतला असल्याने मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे ही बाब मनपा आयुक्त शुभा बी. यांनी गांभीर्याने घेत स्वत: बुधवार दि. 8 रोजी बाजारपेठेत फेरफटका मारत विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना तातडीने परवाना घेण्याबाबत सक्त सूचना केली. तसेच याला कारणीभूत धरत मनपाच्या वरिष्ठ निरीक्षक सुवर्णा पवार यांना आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करायचा असल्यास आधी मनपाकडून व्यापार परवाना घेणे जरुरीचे आहे. व्यापार परवान्याच्या माध्यमातून मनपाला आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र, शहर आणि उपनगरात बहुतांश जणांनी मनपाकडून व्यापार परवानाच घेतलेला नाही. ज्या व्यावसायिकांनी परवाना घेतला आहे त्यांनी त्याचे नूतनीकरण केलेले नाही, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यवसाय परवाना न घेतलेल्यांवर कारवाई करण्यासह नूतनीकरण न केलेल्यांवरही कारवाई करण्याची सूचना मनपा आयुक्तांनी केली आहे.
महसूल आणि आरोग्य खात्याकडून म्हणावी तशी कारवाई होत नसल्याने स्वत: मनपा आयुक्त शुभा बी. रस्त्यावर उतरल्या आहेत. बुधवारी आयुक्तांनी आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे, पर्यावरण अभियंता हनुमंत कलादगी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना सोबत घेऊन बाजारपेठेतील विविध दुकानांना भेटी दिल्या. त्यावेळी सुमारे 4 हजारांहून अधिक व्यावसायिकांनी व्यापार परवाना घेतला नसल्याचे दिसून आले. काही व्यावसायिकांनी विनाकारण सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग परवाना (एमएसएमईएस) घेतला आहे. ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूचे उत्पादन केले जाते आणि 20 हून अधिक कर्मचारी कार्यरत असल्यास त्यांना ईएसआय आणि पीएफ लागू असेल तरच एमएसएमईएस परवाना लागू होतो. पण 10×10 च्या जागेत दुकान थाटलेल्या व्यावसायिकांनी मनपाचा व्यापार परवाना घेण्याऐवजी एमएसएमईएस परवाना घेतला आहे. त्यामुळे हा प्रकार पाहून मनपा आयुक्त शुभा बी. यांचा पारा चढला. त्यांनी तशा व्यावसायिकांना धारेवर धरत तातडीने मनपाचा परवाना घेण्याचा सूचनावजा इशारा दिला. परवाना न घेतल्यास नोटीस बजावण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला. या सर्व प्रकाराला कारणीभूत धरत आरोग्य विभागाच्या वरिष्ठ महसूल निरीक्षक सुवर्णा पवार यांना मनपा आयुक्त शुभा बी. यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे महसूल आणि आरोग्य खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
मनपाला मिळणारे उत्पन्न घटले
बाजारपेठेतील 4 हजारांहून अधिक व्यावसायिकांनी मनपाचा व्यापार परवाना घेतलेला नाही. तर घेतलेल्यांनी त्याचे नूतनीकरण केले नाही. व्यापार परवान्याच्या माध्यमातून मनपाला मिळणारे उत्पन्न घटले आहे. काहींनी विनाकारण एमएसएमईएस परवाना घेतला आहे. या सर्व प्रकाराला कारणीभूत धरत मनपाच्या वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुवर्णा पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
- शुभा बी., मनपा आयुक्त