बेंगळुरात फटाक्यांमुळे 250 हून अधिक जण जखमी
बेंगळूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरात फटाके फोडताना डोळ्यांना इजा झालेल्यांसह 250 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहरातील विविध नेत्र रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. फटाके फोडणाऱ्यांपेक्षा पाहणारे आणि रस्त्यावरून जाणारे लोक फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे जखमी झाले आहेत. नारायण नेत्रालयात 100 जणांवर उपचार करण्यात आले असून यामध्ये 50 मुलांचा समावेश आहे. तसेच 10 जणांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. उर्वरित लोकांवर बाह्यारुग्ण आणि आंतररुग्ण म्हणून उपचार करण्यात आले आहेत. 100 जणांपैकी 50 जण स्वत: फटाके फोडताना जखमी झाले आहेत.
उर्वरित लोक इतरांनी फोडलेल्या फटाक्मयांमुळे जखमी झाले आहेत. याचबरोबर मिंटो नेत्र रुग्णालयात 30 जणांवर उपचार करण्यात आले आहेत. शंकर नेत्र रुग्णालयात 20 प्रकरणे नोंदविण्यात आली होती तर प्रभा नेत्र रुग्णालयात 10 जखमींवर उपचार करण्यात आले. अग्रवाल नेत्र रुग्णालयात 10 उपचार घेतल्यानंतर घरी परतले आहेत. फटाक्याच्या ठिणगीमुळे 20 वषीय तरुणाला कायमची दृष्टी समस्या निर्माण झाली आहे. बिहारचा रहिवासी असलेला हा तरुण अक्किपेठ येथे राहत असून त्याचे संपूर्ण कुटुंब त्याच्या कामावर अवलंबून आहे. सध्या या तरुणावर मिंटो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.