यावर्षी बारावीसाठी 21 हजारहून अधिक परीक्षार्थी
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 41 परीक्षा केंद्रांवर होणार परीक्षा : सीसीटीव्हींची राहणार नजर
बेळगाव : बारावीची परीक्षा अवघ्या महिनाभरावर आली असल्याने विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. यावर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 21 हजार 517 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. एकूण 41 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार असून यासाठी सीसीटीव्हींची व्यवस्था केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारी परीक्षा म्हणून बारावी परीक्षेकडे पाहिले जाते. विज्ञान, वाणिज्य व कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले आहेत. बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर, बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग या तालुक्यांचा बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात समावेश होतो. यावर्षी 21 हजार 517 फ्रेशर्स विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले आहेत. याबरोबरच मागीलवर्षी विषय राहिलेले विद्यार्थीही परीक्षेला बसणार आहेत.
शैक्षणिक जिल्ह्यात मागीलवर्षी 42 परीक्षा केंद्रे होती. यावर्षी मात्र शहरातील आदर्श विद्यालय हे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आल्याने परीक्षा केंद्रांची संख्या 41 झाली आहे. या सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर वेबकास्टींगद्वारे परीक्षेची सर्व माहिती पदवीपूर्व शिक्षण विभागाकडे ठेवली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे कॉपी होणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 1 मार्चपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वीच परीक्षेचे अंतिम वेळापत्रक परीक्षा मंडळाकडून जाहीर करण्यात आले. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उजळणी परीक्षा घेण्यात आली. सध्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहे.
एसएसएलसी परीक्षेप्रमाणे वेबकास्टींग केले जाणार
पीयुसी द्वितीय परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही सीसीटीव्हींची नजर असणार आहे. त्याचबरोबर एसएसएलसी परीक्षेप्रमाणे वेबकास्टींग केले जाणार आहे. सध्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असून विद्यार्थ्यांचा उजळणीवर भर आहे.
- एम. एम. कांबळे (पदवीपूर्व जिल्हा शिक्षणाधिकारी)