स्पेनमध्ये पावसाचे 200 हून अधिक बळी
50 वर्षातील विक्रमी पर्जन्यवृष्टी : 8 तासात 1 वर्षाचा पाऊस
वृत्तसंस्था/ व्हॅलेन्सिया
स्पेनमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे दोनशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पूर्व स्पेनमधील व्हॅलेन्सिया शहराला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. आतापर्यंत येथे 155 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तसेच बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मृतांचा एकूण आकडा 205 वर पोहोचला आहे. मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे रस्ते, पूल आणि घरे-इमारतींचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच ग्रामीण भागात शेती-भातीलाही मोठा फटका बसला आहे. शहरी भागात अनेक घरे आणि व्यापारी सदनिकांमध्ये पाणी घुसले असून प्रचंड आर्थिक फटका बसला आहे.
पूरस्थितीमुळे स्पेनमध्ये 3 दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. पावसाची भयावह स्थिती शनिवार, 2 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर लोकांना घरीच सुरक्षितपणे राहण्याचा सल्ला दिला आहे. हवामान खात्याने शुक्रवारी आणखी पावसाचा इशारा दिला असून पर्जन्यमान वाढल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. पूरग्रस्त भागात मदतकार्यासाठी लष्कराचे 1000 हून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत. मात्र, पुरेशी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. पुरामुळे रस्ते उद्ध्वस्त झाले असून दळणवळण आणि वीजवाहिन्यांचे नुकसान झाल्यामुळे अनेक भाग अजूनही शहरांपासून तुटलेले आहेत.
भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील व्हॅलेन्सियामध्ये 29 ऑक्टोबर रोजी अवघ्या आठ तासांत 12 इंच पाऊस कोसळला. या भागात एवढा पाऊस वर्षभर पडतो. मुसळधार पावसामुळे अचानक पूर आल्यामुळे अनेकांना सुरक्षितस्थळी जाण्याची संधी मिळाली नाही. व्हॅलेन्सियामध्ये सुमारे 50 लाख लोक राहत असून जवळपास सर्वांना महापुराचा फटका बसला आहे. स्पेनच्या अलीकडच्या इतिहासात पुरामुळे इतक्मया लोकांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्पेनमध्ये यापूर्वीचा सर्वात मोठा पूर 1973 मध्ये आला होता. त्यानंतर 150 लोकांचा मृत्यू झाला. त्याआधी 1957 मध्ये व्हॅलेन्सिया शहरात झालेल्या पुरात 81 लोकांचा मृत्यू झाला होता.
पर्जन्यवृष्टीमागील कारण
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे स्पेनच्या किनारपट्टी भागाला मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. थंड आणि उष्ण वाऱ्याच्या संयोगाने दाट ढग तयार झाल्यामुळे मुसळधार पाऊस झाला. अलीकडच्या काळात जगात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडून विध्वंस होण्याच्या घटना घडल्या आहेत. स्पॅनिशमध्ये याला दाना इफेक्ट म्हणतात. शास्त्रज्ञांच्या मते, भूमध्य समुद्रातील अतिउष्णता हेदेखील अतिवृष्टीचे कारण बनले आहे. यावषी ऑगस्टमध्ये भूमध्य समुद्राचे तापमान 28.47 अंश सेल्सिअस नोंद झाले होते.