दोन दिवसात सीरियात 180 हून अधिक ठार
‘असद’ समर्थकांचा लष्कराशी हिंसक संघर्ष
वृत्तसंस्था./ दमास्कस
सीरियात लताकिया आणि टार्टसच्या किनारी भागात लष्कर आणि माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या समर्थकांमध्ये भीषण संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षात दोन दिवसांत 180 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, 300 हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. या संघर्षाचे क्षेत्र रशियाच्या नियंत्रणाखालील एअरबेसजवळ आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी एका व्यक्तीला अटक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर संघर्ष सुरू झाला आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लताकिया आणि टार्टसमध्ये मोठ्या प्रमाणात सैन्यबळ तैनात केले आहे. तसेच, कर्फ्यू लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
असदच्या निष्ठावंत समर्थकांनी सुरक्षा दलांवर हल्ला केल्यामुळे हिंसाचार भडकल्याचा दावा सरकारच्यावतीने करण्यात आला आहे. त्याचवेळी, निवासी भागात बॉम्बस्फोट केल्याचा आरोप असदच्या समर्थकांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर केला आहे. लताकिया आणि टार्टस प्रांतातील हिंसाचारामुळे अबू मोहम्मद अल-जुलानी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसमोर आव्हान निर्माण झाले आहे. हे भाग अल्वी समुदायाचे बालेकिल्ले आहेत. हा समुदाय माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्याशी एकनिष्ठ राहिला आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये बशर अल-असद यांना सत्तेवरून काढून टाकल्यानंतर सीरियातील हा सर्वात भीषण हिंसक संघर्ष आहे.