For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आतापर्यंत दीडशेहून अधिक घरांची पडझड

11:35 AM Jul 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
आतापर्यंत दीडशेहून अधिक घरांची पडझड
Advertisement

जिल्ह्यात जोरदार पावसामुळे चौघा जणांचा मृत्यू : सहा जनावरेही दगावली

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असून बेळगाव व खानापूर तालुक्यासह इतर भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसात गेल्या 1 जून ते 22 जुलैपर्यंत 160 पेक्षा अधिक घरांची पडझड झाली असून चौघांचा मृत्यू झाला आहे. तर सहा प्राणीही दगावले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने मलप्रभा, घटप्रभा, मार्कंडेय या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच शेजारील महाराष्ट्र राज्यामध्येही पावसाचा जोर कायम असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अपेक्षेनुसार पाऊस होत असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या जून ते 22 जुलैपर्यंत बेळगाव तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला आहे तर निपाणी व मुडलगीमध्ये प्रत्येकी एकजण दगावला आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे. खानापूर तालुक्यामध्ये पाऊस अपेक्षेपेक्षा अधिक पडत असल्याने घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली आहे. यासह हुक्केरी, बैलहोंगल, कित्तूर, सौंदत्ती, रामदुर्ग व यरगट्टी तालुक्यांमध्येही घरांची पडझड झाली आहे.

160 घरांची पडझड 

Advertisement

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 160 घरांची पडझड झाली असून दोन घरे पूर्णपणे कोसळली आहेत. 41 घरांचा काही भाग कोसळला आहे. बेळगाव तालुक्यामध्ये पीकहानी झाली असून बागायत पिकांचेही नुकसान झाले आहे.

Advertisement
Tags :

.