खोल समुद्रात ११ हजारांहून अधिक व्हायरस
वैज्ञानिकांना 11,742 व्हायरस मिळाले आहेत. यातील 11,662 व्हायरस असे आहेत, ज्यांच्याविषयी पूर्वी कुठलीच माहिती नव्हती. चीनच्या एका संशोधन पथकाने समुद्राच्या तळाला असलले माती आणि मलाचे नमुने प्राप्त करत त्याची तपासणी केली होती, याचदरम्यान या व्हायरसचा शोध लागला आहे.
या भागाला क्लॅरियन-क्लिपरटन झोन म्हटले जाते, येथे निकेल, कोबाल्ट आणि मॅगनीज यासारख्या धातूंचे मोठे साठे आहेत. संशोधनात येथे मिळालेले बहुतांश व्हायरस पूर्वीपासून नोंद व्हायरसपेक्षा खूपच वेगळे आहेत. समुद्राच्या खोलवर होणाऱ्या खननामुळे हे व्हायरस जगाला नुकसान पोहोचवू शकतात अशी चिंता वैज्ञानिकांना आहे. यासंबंधीचे संशोधन नेचर कम्युनिकेशन्स नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.
समुद्रात इतक्या खोलवर सूर्यप्रकाश पोहोचत नाही. येथे भोजनासाठी आवश्यक पोषक घटक अत्यंत कमी असतात. तरीही या ठिकाणी व्हायरस आणि बॅक्टेरिया आहेत. हे व्हायरस इतक्या प्रतिकूल वातावरणात कसे राहतात आणि समुद्राच्या तळाला काय करतात हे वैज्ञानिक समजून घेऊ इच्छितात. या शोधामुळे खोल समुद्रातील जीवनाविषयी नवी माहिती मिळाली आहे.

पहिल्यांदाच कळले
संशोधनात एकूण 11,742 व्हायरस मिळालेअ सून यातील 11,662 व्हायरसविषयी पूर्वी कुठलीच माहिती नव्हती. म्हणजेच या भागात मिळालेले व्हायरस विज्ञानासाठी नवे आहेत. वैज्ञानिकांनी या व्हायरसमधील प्रोटीन समुहांविषयी तपासणी केली. प्रोटीन व्हायरसच्या काम करण्याच्या पद्धतीला समजाविण्यास मदत करतात. तपासणीत या व्हायरसच्या प्रोटीन समुहांपैकी केवळ 4 टक्के जुन्या डाटाशी जुळले. याचा अर्थ येथे असे अनेक व्हायरस आहेत, ज्यांच्याविषयी वैज्ञानिकांना आतापर्यंत माहिती नव्हती.
बॅक्टेरियावर आक्रमण
संशोधनात मिळालेले बहुतांश व्हायरस कॉडोविरिसीट्स नावाच्या समुहाशी जोडलेले आहेत. या व्हायरसच्या संरचनेत शेपटासारखी रचना असते. हे बॅक्टेरियांवर हल्ला करतात आणि स्वत:चे जेनेटिक मटेरियल म्हणजेच आनुवांशिक माहिती त्याच्या आत पोहोचवितात. हे व्हायरस माणसांना संक्रमित करणाऱ्या व्हायरसपेक्षा वेगळे आहेत. संशोधनात मिळालेले बहुतांश व्हायरस बॅक्टेरियांना लक्ष्य करतात, याचमुळे त्यांना माणसांसाठी थेट धोका म्हणून पाहिले जात नाही. परंतु या व्हायरसविषयी अद्याप खूप काही जाणून घेणे बाकी आहे.
पोषक घटकांचे संतुलन
समुद्राच्या तळाला व्हायरस बॅक्टेरियांच्या संख्येला नियंत्रित करण्यास मदत करतात. व्हायरस बॅक्टेरियाला संक्रमित करतात, तेव्हा बॅक्टेरिया तुटल्याने जैविक पदार्थ बाहेर पडतात, यामुळे पोषक घटक पुन्हा वापरासाठी उपलब्ध होऊ शकतात. हे पोषक घटक समुद्रात राहणाऱ्या इतर छोट्या जीवांसाठी देखील आवश्यक असतात. जर व्हायरसची संख्या किंवा त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत मोठा बदल घडला तर याचा प्रभाव समुद्राच्या इतर जीवांवरही पडू शकतो. याचमुळे वैज्ञानिकांसाठी या व्हायरसच्या भूमिकेला समजून घेणे आवश्यक आहे.
खननामुळे बिघडणार संतुलन
क्लॅरियन-क्लिपरटन झोनमध्ये निकेल, कोबाल्ट आणि मॅगनीज यासारख्या धातूंचे साठे आहेत. या धातूंचा वापर बॅटरी आणि इतर तंत्रज्ञानांमध्ये होतो. याचमुळे या भागात समुद्राखाली खनन करण्याची रुची वाढली आहे. परंतु खननादरम्यान समुद्राच्या तळावरील माती हटविली जाते. यामुळे तेथे राहणाऱ्या छोट्या जीवांचे वातावरण बदलू शकते. याचा प्रभाव व्हायरस आणि बॅक्टेरियावरही पडू शकतो. या भागाला पूर्णपणे समजून घेण्यापूर्वी खनन सुरू झाल्यास समुद्रातील या अनोख्या वातावरणाला नुकसान पोहोचू शकते अशी वैज्ञानिकांना चिंता आहे. या शोधामुळे खोल समुद्रात व्हायरसचे एक मोठे जग असल्याचे कळले आहे. हे व्हायरस समुद्रात पोषक घटकांच्या पुनर्वापरात मदत करतात. याचमुळे खोल समुद्रात खनन करण्यापूर्वी यामुळे तेथे राहणाऱ्या जीवांवर कोणता प्रभाव पडू शकतो हे जाणून घेणे आवश्यक आहे.