इराणमधील स्फोटात 100 हून अधिक ठार
जनरल कासिम सुलेमानी यांच्या कबरीजवळ शक्तिशाली स्फोट : हल्ल्यात 170 हून अधिक जखमी
वृत्तसंस्था/ तेहरान, केरमन
इराणमधील केरमन शहरात बुधवारी झालेल्या दोन शक्तिशाली स्फोटात 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तसेच 170 हून अधिक लोक जखमी झाले असून त्यातील बरेच जण गंभीर असल्याची माहिती देण्यात आली. देशाचे माजी जनरल कासिम सुलेमानी यांच्या कबरीजवळ हे स्फोट झाले. सुलेमानी यांच्या हत्येच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान हे स्फोट झाल्याची माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली. इराणच्या नायब राज्यपालांनी या घटनेला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेने 2020 मध्ये जनरल कासिम सुलेमानी यांना ड्रोन हल्ल्यात ठार केले होते. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर सुलेमानी यांची गणना देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अनेक मृतदेह रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून येत आहेत. व्हिडिओमध्ये स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात लोक परिसरातून पळ काढताना दिसत आहेत. गर्दीत घडवण्यात आलेल्या स्फोटानंतर चेंगराचेंगरीही झाली. चेंगराचेंगरीत काही लोक चिरडल्याने घटनेची तीव्रता वाढली आहे.
स्फोटातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्मयता इराणच्या नॅशनल इमर्जन्सी सर्व्हिसेस ऑर्गनायझेशनचे प्रवक्ते बाबक येकता परस्त यांनी व्यक्त केली. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना अधिक उपचारार्थ तेहरान येथे हलविण्यासाठी हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आली होती. तसेच रुग्णालयांसाठी आपत्कालीन सेवा अलर्टही जारी करण्यात आला होता.
अमेरिकेच्या हल्ल्यात सुलेमानींचा मृत्यू
3 जानेवारी 2020 रोजी बगदाद विमानतळावर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात माजी जनरल सुलेमानी मारले गेले होते. त्यांच्या मृत्यूला बुधवारी चार वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचदरम्यान दोन शक्तिशाली स्फोट घडविण्यात आले. 2020 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुलेमानीच्या मृत्यूसंदर्भात भाष्य करताना ‘सर्वात मोठा विजय’ असे संबोधले होते. तसेच सुलेमानीला जगातील नंबर एक दहशतवादी देखील म्हटले होते.