नवरात्रोत्सवात 10 ते 12 लाखाहून अधिक भाविक यल्लम्मा डोंगरावर उपस्थित राहणार
देवीची विशेष पूजा-विविध स्वरूपात आरास
वार्ताहर/बाळेकुंद्री
सोमवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी यल्लम्मा डोंगरावर सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. भाविकांत उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लमा देवस्थानात नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. नवरात्रोत्सवापूर्वीच यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी रविवारी सकाळपासून डोंगरावर भाविकांनी एकच गर्दी केली होती. गेल्या आठवड्यापासून यल्लम्मा मंदिराचे रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले असून मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. 22 रोजी घटस्थापना, 1 ऑक्टोबरला खंडेपूजा तर 2 ऑक्टोबरला विजयादशमी साजरी होणार असल्याची माहिती मंदिराचे कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांनी दिली.
नवरात्र काळातील पहिल्या, पाचव्या, सातव्या व नवव्या देवशी भाविकांची संख्या जास्त राहणार आहे. एकूण नवरात्रोत्सवात बारा लाखाहून अधिक भाविक डोंगरावर उपस्थिती राहणार असल्याचा अंदाज आहे. भाविकांना पिण्या पाण्याच्या सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून बसची सोय, वीज, आरोग्य व स्वच्छता आदी सुविधा पुरविल्या जात असून डोंगरावर संपूर्णपणे प्लास्टिक वापराचा निषेध करण्यात आला असल्याचे मंदिर विकास प्राधिकारण अधिकारी अशोक दुडगुंटी यांनी सांगितले.नवरात्रोत्सवात यल्लम्मा देवस्थानाला विशेष महत्त्व असून देवीची नऊ दिवसात विविध स्वरूपात आरास करून देवीची विशेष पूजा बांधण्यात येणार आहे. सोमवारी घटस्थापनेनिमित्त अभिषेक, होम, विशेष पूजा व आरतीनंतर देवीच्या दर्शनाला सुरुवात होते.