नव्या आर्थिक वर्षारंभापासून खिशावर आणखी ताण
दूध, दही, वीज दरवाढ आजपासून लागू : मुद्रांक शुल्क 50 रुपयांवरून 500 रु. होणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील जनतेच्या खिशावर आणखी ताण पडणार आहे. नंदिनी ब्रॅण्ड दूध, दही आणि वीज दरवाढ 1 एप्रिलपासून लागू होत आहे. याच दरम्यान, बेंगळूरमध्ये कचरा संकलन शुल्क व ऑटोरिक्षा भाडे दरात वाढ करण्यात आली आहे. महागाईमध्ये होरपळून निघालेल्या जनतेला दरवाढीमुळे आणखी फटका बसणार आहे. बस तिकीट दर आणि मेट्रो रेल्वे तिकीट दरात यापूर्वीच वाढ झाली आहे. आता नव्या आर्थिक वर्षारंभापासून ऊर्जा खात्याने कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युईटी देण्यासाठी प्रति युनिट 36 पैसे वीज दरवाढ केली आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना प्रोत्साहन धन देण्यासाठी नंदिनी ब्रॅण्डच्या दूध व दह्याच्या दरात प्रतिलिटर 4 रुपये वाढ करण्यात आली आहे. नवे दर 1 एप्रिलपासून लागू होत आहेत. दूध दर वाढल्याने हॉटेल्समध्ये चहा-कॉफीचे दरही वाढण्याची शक्यता आहे.
कर्नाटक वीज नियंत्रण आयोगाच्या (केईआरसी) आदेशानुसार प्रति युनिट वीज दर 36 पैशांनी वाढविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मासिक शुल्कात 20 रुपये वाढ केल्याने वीज ग्राहकांना 120 रु. ऐवजी 140 रु. शुल्क भरावे लागतील. त्यामुळे ग्राहकांना फटका बसणार आहे.
मुद्रांक शुल्कातही वाढ
मुद्रांक शुल्क देखील मंगळवारपासून 50 रुपयांवरून 500 रु. होणार आहे. अॅफिडेव्हीट शुल्क 20 रु. वरून 100 रुपये वाढ होईल. नवी वाहने खरेदीचे स्वप्न बाळगलेल्या ग्राहकांनाही ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत. स्टीलच्या सुट्या भागांच्या किमतीत वाढ झाली आहे. सुट्या भागांच्या आयात शुल्कातही वाढ झाल्याने वाहनांचे दरही वाढतील.
बेंगळूरवासियांना भरावे लागणार कचरा संकलन शुल्क
मंगळवारपासून बेंगळूरमध्ये कचरा संकलनावरही शुल्क द्यावे लागणार आहे. 600 चौ. फूट घरासाठी 10 रु., 600 ते 1,000 चौ. फूट घरासाठी 50 रु., 1,001 ते 2,000 चौ. फूट घरासाठी 100 रु. कचरा संकलन शुल्क आकारण्यात येणार आहे. व्यावसायिक इमारतींसाठी 500 रु. तसेच दररोज 50 किलो कचरा जमा केला जात असेल तर 2,000 रु. आणि दररोज 100 किलो किंवा त्यापेक्षा अधिक कचरा उत्पन्न करणाऱ्यांना 14,000 रु. कर भरावा लागणार आहे. बेंगळूरमध्ये प्रतिलिटर पाणीपट्टीत 1 पैसे वाढ करण्यात आली आहे.