माफिया अतिक अहमदवर आणखीही आरोपनिश्चिती
वृत्तसंस्था/ लखनौ
लखनौमधील व्यापारी मोहित जैस्वाल यांचे अपहरण आणि खंडणी उकळल्याप्रकरणी माफिया अतिक अहमद आणि त्याचा मुलगा उमर यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. उमरवर गंभीर कलमांखाली आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या सुनावणीवेळी अतिक अहमद याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. 28 डिसेंबर 2018 रोजी व्यापारी मोहित जैस्वाल यांनी कृष्णा नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यात देवरिया कारागृहात बंद असलेल्या अतिक अहमद याने गोमतीनगर येथील कार्यालयातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांचे अपहरण केल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यानंतर स्टॅम्प पेपरवर बळजबरीने सह्या करून 45 कोटींची मालमत्ता त्यांच्या नावावर करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. अतिकवर विविध कलमांखाली एकूण 101 गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या न्यायालयात 50 खटले सुरू असून खून, दरोडा, खंडणी, अपहरण आदींचा समावेश आहे.