For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जवानांकडून देशसेवेला अधिक महत्त्व

11:05 AM Mar 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
जवानांकडून देशसेवेला अधिक महत्त्व
Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे मनोगत : कंग्राळी बुद्रुक येथे माजी सैनिक संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन

Advertisement

वार्ताहर /कंग्राळी ब्रद्रुक

ईश्वरी सेवेपेक्षाही देशसेवेला अधिक महत्त्व आहे. आपले जवान देशाच्या सरहद्दीवर डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस पहारा देतात म्हणून तुम्ही आम्ही ऐश आराम जीवन जगत असतो. प्रत्येक जवानाच्या डोळ्यात देशसेवेचे प्रेम अधिक फुलून दिसते. देश सुरक्षित व समृद्ध ठेवण्यासाठी जवानांचा सिंहाचा वाटा असतो, असे मनोगत ग्रामीणच्या आमदार व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. कंग्राळी बुद्रुक येथे माजी सैनिक संघटनेतर्फे रविवारी येथील जुन्या ग्रा. पं. कार्यालयातील इमारतीत सुरू केलेल्या माजी सैनिक संघटना कार्यालयाचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष रामा तारीहाळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून हिंडाल्कोचे एच. आर. विजय शेखर, सिनियर मॅनेजर दिनेश नाईक, काकती पोलीस निरिक्षक उमेश, ग्रा.पं. अध्यक्षा कौसरजंहा सय्यद, बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटना अध्यक्ष बसाप्पा तलवार, कंग्राळी बुद्रुक माजी सैनिक संघ उपाध्यक्ष अरुण पाटील, अॅड. सुधीर चव्हाण, युवराज कदम, पीडीओ गोविंद रंगाप्पगोळ, सेक्रेटरी सी. के. तलवार, तलाठी दयानंद कुगजी, एन. कळसण्णावर, रेणुका पाटील, रूपाली पाटील आदी उपस्थित होते.

Advertisement

यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले तर त्याच्यांच हस्ते फीत कापून माजी सैनिक संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. संतोष कडोलकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. अर्चना पाटील व प्रेमा तारीहाळकर यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व फळांची टोपली देऊन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सत्कार करण्यात आला. ग्रा. पं. महिला सदस्या व पुरूष सदस्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन मंत्री हेब्बाळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर, ग्रा. पं. महिला सदस्या व पुरूष सदस्यांचाही माजी सैनिक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शासकीय निधीतून सैनिक भवनासाठी निधी मंजूर करून देऊ, अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाला ग्रा. पं. आजी माजी सदस्य, सदस्या माजी सैनिक संघटनेचे सदस्य व संघटनेच्या परिवारासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन पुंडलिक पाटील यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Advertisement
Tags :

.