हरित उर्जा निर्मित्तीचे अधिकाधिक प्रयत्न हवे
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे प्र्रतिपादन : सूर्यघर योजना प्रशिक्षण कार्यशाळेचे मिरामार येथे उद्घाटन
पणजी : गोवा राज्यात हरित उर्जेची निर्मिती करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याची गरज वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी वर्तवली आहे. पीएम सुर्यघर योजना प्रशिक्षण कार्यशाळेचे मिरामार येथे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, वीज अभियंत्यांना सदर योजनेची परिपूर्ण माहिती व्हावी म्हणून ही प्रशिक्षण कार्यशाळा आखण्यात आली असून सध्या गोव्यात सदर योजनेंतर्गत 1 मेगावॅट वीज तयार होत आहे. त्या योजनेतून 10 मेगावॅट वीजनिर्मिती होणे आवश्यक आहे. त्यासाठी वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी त्या योजनेचे अर्ज लवकर निकालात काढावेत अशी सूचना ढवळीकर यांनी केली.
पीएम सुर्यघर योजनेसाठी सध्या 3500 अर्ज आले असून त्यांची छाननी व पाहणी करण्याचे काम सुरु आहे. योजना कशी पुढे न्यावी याची माहिती कार्यशाळेतून मिळणार असून एप्रिलनंतर पुन्हा एक प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी अभियंते सुर्यघर योजनेची माहिती गावोगावी फिरुन देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस, अभियंता मयूर हेदे, संजय पाटील, त्रिपुरा ठाकूर इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते. पीएम सुर्यघर योजना राज्य सरकारतर्फे देण्यात आली असून अर्जदाराला त्या योजनेचा कितपत लाभ होणार याचा तपशील घेतल्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.