यापुढे कचऱ्याचे अधिक कार्यक्षमतेने वर्गीकरण
मनपाकडून 1 एप्रिलपासून अधिक कठोर नियम
प्रतिनिधी/ पणजी
कार्यक्षम कचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन देऊन त्या माध्यमातून स्वच्छता सुधारण्याच्या उद्देशाने, पणजी मनपाने घनकचरा व्यवस्थापन नियम, 2026 लागू करण्याची घोषणा केली आहे.
या नियमांनुसार राजधानीतील नागरिक, संस्था आणि व्यावसायिक आस्थापने यांच्यासाठी अधिक कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 27 जानेवारी रोजी जारी केलेले हे सुधारित नियम येत्या दि. 1 एप्रिल पासून लागू होणार आहेत.
या आराखड्यामुळे शहरभरातील कचरा व्यवस्थापनासाठी अधिक संरचित आणि तंत्रज्ञान-आधारित दृष्टिकोन येण्याची अपेक्षा आहे. कचऱ्याचे त्याच्या स्रोतावरच चार श्रेणींमध्ये वर्गीकरण करणे हे या नवीन नियमांमधील प्रमुख वैशिष्ट्या आहे. ‘प्रदूषण करणाराच भरपाई देईल’ या तत्त्वाची अंमलबजावणी करणारे हे धोरण आहे. त्यामुळे अयोग्य विल्हेवाटीसाठी कचरा निर्माण करणाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. या प्रणालीमध्ये डिजिटल कचरा तपासणी आणि स्मार्ट देखरेख यंत्रणा यांचा समावेश असेल. मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांवर विशेष भर देण्यात आला आहे. त्यात मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या, व्यवसाय, शैक्षणिक संस्था, ऊग्णालये आणि सरकारी कार्यालये यांचा समावेश आहे. मनपाने अशा सर्व संस्थांना केंद्रीकृत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे अनिवार्य केले आहे.
याव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांना त्यांच्या परिसरातील विघटनशील आणि बागेतील कचऱ्याचे कंपोस्टिंग, बायोमिथेनेशन किंवा इतर मान्यताप्राप्त पद्धतींद्वारे व्यवस्थापन करणे गरजेचे असेल, ज्यामुळे मनपाच्या कचरा संकलन प्रणालीवरील अवलंबित्व कमी होईल. जे स्वत:च्या जागेवर कचऱ्यावर प्रक्रिया करू शकत नाहीत. त्यांच्यासाठी नियमांनुसार ‘विस्तारित मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्थेची जबाबदारी’ प्रमाणपत्राद्वारे एक पर्याय उपलब्ध आहे. या तरतुदीनुसार, संस्थांना समर्पित कचरा संकलन, वाहतूक आणि प्रक्रिया सेवांसाठी पैसे द्यावे लागतील.