For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नैतिक पोलीसगिरी अन् नेत्यांची दबंगगिरी

06:30 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
नैतिक पोलीसगिरी अन् नेत्यांची दबंगगिरी
Advertisement

उत्तर कर्नाटक नैतिक पोलीसगिरीच्या घटनांमुळे हादरले असून या घटना थोपवण्यासाठी राज्य सरकारने योग्य त्या उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप होताना दिसतो आहे. हावेरी जिल्ह्dयातील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण काँग्रेस सरकारकडून दडपले जात असल्याचा दुसरीकडे आरोप होतोय. खासदार हेगडे यांच्या वरिष्ठ नेत्यांबाबत एकेरी उल्लेखाचा मुद्दाही पुढे येतो आहे. तर काँग्रेस, भाजप-निजद आता लोकसभेच्या निवडणूकीच्या मोर्चेबांधणीत गर्क झाले आहेत. उत्तर कर्नाटकात नैतिक पोलीसगिरीच्या घटना वाढल्या आहेत. बेळगाव येथील किल्ला तलाव परिसरात फिरायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर प्रेमीयुगुल समजून एका जमावाने हल्ला केला होता. आंतरजातीय विवाहामुळे तरुण हिंदू व तरुणी मुस्लीम असूनही नात्याने ते भाऊबहीण होते. ही घटना ताजी असतानाच हावेरी जिल्ह्यातील हानगल येथे याहूनही भयावह घटना घडली आहे. मुस्लीम महिला हिंदू युवकाबरोबर लॉजमध्ये सापडली म्हणून त्या महिलेवर निर्जन प्रदेशात सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे.

Advertisement

या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. यापूर्वी दक्षिणेतील किनारपट्टीच्या जिल्ह्यात नैतिक पोलीसगिरीच्या घटना घडत होत्या. त्यावेळी काँग्रेस नेते आक्रमक व्हायचे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर असे प्रकार खपवून घेणार नाही, असे सांगत होते. आता कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आहे. दक्षिणेऐवजी उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यात नैतिक पोलीसगिरीच्या घटना वाढल्या आहेत. त्या थोपविण्यासाठी सरकारने प्रभावी उपाययोजना केली नाही, असा आरोप केला जात आहे.

हावेरी जिल्ह्यातील हानगल येथील सामूहिक अत्याचार प्रकरण दडपण्यासाठी कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असा उघड आरोप माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केला आहे. सामूहिक अत्याचार प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक झाली आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन संबंधितांना कायद्याचा हिसका दाखवण्याऐवजी सरकार हे प्रकरणच दडपण्याच्या प्रयत्नात आहे, असा त्यांचा आरोप आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मात्र हा आरोप मान्य नाही. प्रकरण गंभीर आहे, ते दडपण्याचा प्रश्नच येत नाही. आतापर्यंत सात जणांना अटक झाली आहे. प्राथमिक अहवाल आल्यानंतर हे प्रकरण विशेष पथकाकडे सोपवायचे का? याचा विचार केला जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा सामाजिक संवेदनशील मुद्दा राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांसाठी तोंडसुख घेण्याचा मुद्दा ठरला आहे. नैतिक पोलीसगिरी करणारे कोणत्याही जातीधर्माचे असोत, त्यांना आवर घातलाच पाहिजे. ही मागणी वाढती आहे.

Advertisement

काही वर्षे विजनवासात राहिलेले कारवारचे खासदार अनंतकुमार हेगडे पुन्हा ठळक चर्चेत आले आहेत. त्यांचे आरोग्य ठिक नाही. त्यामुळे ते राजकारणात सक्रिय नाहीत, अशी चर्चा पूर्वी ऐकायला मिळाली होती. मात्र, आपले आरोग्य ठणठणीत आहे, लोकसभा निवडणुकीत कारवारमधून पुन्हा तुम्हीच यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह वाढला आहे. त्यामुळेच आपण पुन्हा सक्रिय झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपल्या कडक आणि भडक वक्तव्यांमुळे यापूर्वी ते नेहमी चर्चेत रहायचे. आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका करण्याच्या भरात त्यांचा एकेरी उल्लेख केला आहे. काँग्रेस नेत्यांनी तर त्यांच्याविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. भाजपमधील काही नेत्यांनीही राजकारणात कोणत्याही पक्षाच्या नेत्याविरुद्ध एकेरी शब्दप्रयोग योग्य नाही, अशी भूमिका मांडली आहे. तर काही जणांनी अनंतकुमार हेगडे यांचे समर्थनही केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेस नेते एकेरी व शिवराळ भाषेत बोलू शकतात, मुख्यमंत्र्यांविरुद्ध ती भाषा वापरली तर गैर काय आहे? असा प्रश्न काही नेत्यांनी उपस्थित केला आहे. सी. टी. रवी, बसनगौडा पाटील-यत्नाळ आदींसह काही भाजप नेत्यांनी राजकारणात एकेरीचा वापर आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका मांडली आहे.

कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस, प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप व त्यांचा मित्रपक्ष असणारा निजद आदींसह सगळेच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजपने पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड सुरू केली आहे. भाजपबरोबर युती करणारे निजद नेते व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी जागावाटपासंबंधी चर्चा करण्यासाठी दिल्लीत तळ ठोकला आहे. शुक्रवार दि. 19 जानेवारी रोजी बेंगळूर येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कर्नाटक दौरा ठरला आहे. कर्नाटकातील 28 पैकी अधिकाधिक जागा काबीज करण्यासाठी काँग्रेसची व्यूहरचना सुरू आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी कर्नाटकात सध्या भाजपच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघांवर आपली पकड आणखी घट्ट करण्यासाठी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, नूतन प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र तयारीला लागले आहेत. या दोन्ही पक्षांची घोडदौड रोखणारी यंत्रणा विरोधी पक्षात नाही. काँग्रेसचे विरोधक काँग्रेसमध्ये तर भाजपचे विरोधक भाजपमध्येच आहेत, अशी परिस्थिती अजूनही पहायला मिळते. माजी मंत्री व्ही. सोमण्णा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन बेंगळूरला परतल्यानंतर त्यांची नाराजी बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचे दिसते. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी मात्र आपल्याच पक्षाच्या राज्यातील नेतृत्वाविरुद्ध उघडलेली आघाडी सुरूच ठेवली आहे.

अयोध्येत बाबरी मशिद पाडवल्याप्रमाणेच कर्नाटकातील भटकळ, श्रीरंगपट्टण येथील काही मशिदी पाडविल्या पाहिजेत. हवे तर ही धमकी समजा. मंदिरे पाडवून त्या जागांवर मशिदी बांधण्यात आल्या आहेत. याचा सूड उगवायचाच आहे, असे सांगत खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानानंतर कर्नाटकातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. तब्बल चार वर्षांच्या विजनवासानंतर मुख्य प्रवाहात आलेल्या खासदारांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. अशा वक्तव्यांविरुद्ध काँग्रेस नेत्यांनी पलटवार सुरू केला आहे. गेल्या पंधरवड्यातील राजकीय घडामोडी लक्षात घेता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील राजकारणाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू झाली आहे. याचे परिणाम काय होणार आहेत? निवडणुकीच्या तोंडावर जातीय सलोख्याला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत का? आदी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळेच की काय, जातीय सलोख्याला सुरुंग लावणाऱ्यांची गय करू नका, अशी सूचना पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.