ध्येयवादी नेतृत्व राजकारणात आवश्यक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पहिल्याच पॉडकास्टमध्ये प्रतिपादन, विविध विषयांवर व्यक्त केले विचार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशाच्या राजकारणाला ध्येयवादी राजकारणाची आवश्यकता आहे. महात्मा गांधी हे असे ध्येयवादी राजकारणी होते. अमोघ वक्तृत्वाची देणगी नसतानाही आपले विचार तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याची त्यांची हातोटी होती. आपले व्यक्तीमत्व आणि कृती यांच्या माध्यमातून जनतेवर ते प्रभाव टाकत असत, अशी भलावण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रथम पॉडकास्टमध्ये केली आहे. या पॉडकास्टमध्ये त्यांनी भारत देश आणि त्याची प्रगती यांच्या संबंधातील अनेक मुद्यांवर त्यांचे विचार स्पष्टपणे व्यक्त केले आहेत. त्याच्याशी हा संवाद ‘झेरोधा’चे संस्थापक निखील कामत यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून साधला आहे.
राजकारणात प्रवेश करणे सोपे आहे. तथापि, त्या क्षेत्रात यश मिळविणे ही वेगळी बाब आहे. राजकारणात यशस्वी होण्यासाठी अत्यंत कष्ट करावे लागतात. जनतेच्या संतत संपर्कात रहावे लागते. तसेच संघभावनेने काम करण्याची प्रवृत्ती असावी लागते. सर्व लोक आपलेच ऐकतील आणि आपलेच अनुकरण करतील, अशी जर राजकारणात असलेल्या कोणाची भावना असेल, तर ती मोठी चूक ठरते. असे नेते काही निवडणुका जिंकू शकतात, पण राजकारणात प्रदीर्घ काळ यशस्वी होऊ शकत नाहीत, असे प्रतिपादन त्यांनी या पॉटकास्टमध्ये, ‘राजकारणात येण्यासाठी कोणत्या प्रज्ञेची आवश्यकता असते, या प्रश्नावर केले आहे.
स्वातंत्र्यसंग्राम आणि नंतरचा भारत
भारताचा स्वातंत्र्यसंग्राम आणि त्यानंतरचा भारत या विषयावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विस्तृत विवेचन केले आहे. स्वातंत्र्यसंग्रामात बहुविध समाजघटकातील लोकांनी त्यांचे योगदान दिले. काही नेत्यांनी समाजाचे प्रबोधन केले. तर अन्यांनी खादीची चळवळ चालवून समाजामध्ये स्वदेशी भावना जागृत केली. अनेकांनी वनवासी समाजाच्या उद्धारासाठी कार्य केले. तर इतरांनी इतर अनेक क्षेत्रांमध्ये काम केले. बहुविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या या अनेकविध लोकांमध्ये ‘देशभक्ती’ ही एकच सामायिक भावना होती. त्यांची कार्ये भिन्नभिन्न असली, तरी ती देशभक्ती या एकाच भावनेने प्रेरित होती. हीच भावना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यास कारणीभूत ठरली आहे, अशी मांडणी त्यांनी या पॉटकास्टमध्ये केली आहे.
स्वातंत्र्यानंतरही प्रभाव
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या भावनेचा प्रभाव राहिला होता. स्वातंत्र्यानंतर याच भावनेतून प्रेरणा घेत काही लोक राजकारणात आले. त्यांनी राजकारणात येताना स्वत:सह कर्तव्यनिष्ठा आणि इतर गुण आणले होते. विशिष्ट उद्देश मनात ठेवून त्यांनी राजकारण केले. सध्याच्या काळातही गुणवान लोकांनी राजकारणात येण्याची आवश्यकता आहे. मात्र, राजकारणातील प्रत्येकाने स्वत:च्या व्यक्तीगत महत्वाकांक्षांसाठी किंवा व्यक्तीगत स्वार्थासाठी नव्हे, तर राष्ट्रकारणाचे ध्येय साध्य करण्यासाठी राजकारणात कार्य करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
हवेत एक लक्ष ध्येयवादी
तरुणांनीही राजकारणात येणे आवश्यक आहे. देशामध्ये सर्वंकष परिवर्तन होण्यासाठी देशभक्तीने प्रेरित अशा एक लक्ष तरुणांनी नि:स्वार्थी तरुणांनी स्वत:ला राजकारणासाठी अर्पित करणे आवश्यक आहे. राजकारण हे देणे, घेणे, मिळविणे आणि बनविणे यासाठी होता कामा नये, ते देशाच्या सामर्थ्यनिर्माणासाठी व्हावयास हवे आहे. तसे झाल्यास भारताची प्रगती झपाट्याने होईल आणि भारत एक सामर्थ्यसंपन्न देश म्हणून जगात ओळखला जाईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
उद्योगकता आणि राजकारण
उद्योजकता आणि राजकारण यांची तुलनाही त्यांनी त्याविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना केली. उद्योजक त्याच्या व्यवसायाच्या किंवा उत्पादनकेंद्राच्या प्रगतीसाठी वाढीसाठी आणि यशासाठी सदैव प्रयत्नशील असतो. तर राजकारण हे मूलत: ‘राष्ट्राचे हित प्रथम’ या विचाराने चालते. राजकारणाला देशाचा व्यापक आणि समतोल विचार करावा लागतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
मीही आहे मानवच...
माझ्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात मी ही काही चुका केल्या आहेत. कारण, मी ही एक मानवच आहे. प्रत्येक मानव योग्य आणि चुकीचीही कृती करत असतो. मी देव नाही. परिणामी, माझे कार्य मानवाप्रमाणेच आहे. बालपणी अनेक मित्र होते. पण आता त्यांच्यापैकी एकही राहिलेला नाही. मी शाळेत असताना काही विशेष चमकदार कामगिरी केली नव्हती. पण माझ्या एका शिक्षकांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. शाळेत स्पर्धात्मक अभ्यासक्रमांपासून मी दूर रहात असे. तथापि, आता क्षणोक्षणी स्पर्धा आहे आणि मी आनंदाने तिला स्वीकारतो, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित प्रश्नांना उत्तरे देताना दिली आहे.
काय सांगतात पंतप्रधान मोदी...
ड राष्ट्रवादाने प्रेरित तरुणांनी मोठ्या संख्येने राजकारणात येण्याची आवश्यकता
ड राजकारणात येणे सोपे, टिकून राहणे आणि यशस्वी होणे कष्टांवर अवलंबून
ड लोक केवळ आपलेच ऐकतील आणि आपल्याच मानतील अशी भावना चूक
ड सातत्याने जनता संपर्क, संघभावनेने काम करण्याची प्रवृती हीच यशाची सूत्रे