मोपाची वर्षपूर्ती : देशभरातील पहिल्या 15 विमानतळात समावेश
ग्रीनफिल्ड एअरपोर्ट म्हणून मिळविली मान्यता : माल वाहतुकीतही केली प्रगती
पणजी : मोपा-पेडणे येथील मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय विमानतळाने एक वर्ष पूर्ण केले असून या वर्षभरात देशातील 24 शहरे आणि 4 आंतरराष्ट्रीय ठिकाणे जोडणारी सेवा देण्यात यश मिळवले आहे. या विमानतळाचा तिसऱ्या टप्प्यातील विस्तार आता लवकरच पूर्णत्वास जाणार असून त्यानंतर प्रतिवर्षी 8 मिलियन प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होणार आहे. मोपा विमानतळाची भरीव प्रगती पाहून त्याचा देशातील प्रथम 15 विमानतळात समावेश करण्यात आला आहे. मोपा विमानतळाने सर्वोत्तम क्षमतेचा ग्रीनफिल्ड एअरपोर्ट म्हणून मान्यता मिळविली असून सर्वोत्कृष्ट पर्यावरणीय संलग्नता साधली आहे.
मोपा विमानतळाने अल्पावधीतच देशात-परदेशात प्रशंसा मिळवली असून प्रवाशांसाठी चांगल्या सुखसोयी देणारा ठरला आहे. माल वाहतुकीतही (कार्गो सेवा) सदर विमानतळाने लक्षणीय प्रगती साधली असून गेल्या वर्षभरात 750 मे. टन मालाची वाहतूक केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गोवा राज्याच्या आर्थिक विकासाचे नवे दालन खुले झाले आहे. विमानतळाने जागतिक दर्जा प्राप्त केला असून तसा अनुभव प्रवासी वर्ग घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. विमानतळाचा दर्जा सर्वेक्षणात मोपाने चांगलीच बाजी मारली असून तो आता सुपर एक्स्प्रेस मार्गाने व रेल्वेने जोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. इंडिगो, आकासा एअर, विस्तारा, स्पाईसजेट व इतर विमान कंपन्या देशांतर्गत सेवा देत असून एअरइंडिया, ओमान एअर, तुई, इंडिगो या कंपन्या आंतरराष्ट्रीय सेवा पुरवत आहेत. गेल्या वर्षभरात 3 मिलियन प्रवाशांची वाहतूक करण्यात मोपाने मोलाची कामगिरी बजावली असून गोव्यातील हवाई वाहतुकीत मानाचे स्थान मिळवले आहे.