For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘भूतबाधा’ पसरवणाऱ्या दिल्लीवाल्याला मोपा पोलिसांकडून कोठडीची हवा

12:55 PM Sep 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘भूतबाधा’ पसरवणाऱ्या दिल्लीवाल्याला मोपा पोलिसांकडून कोठडीची हवा
Advertisement

पेडणे : मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या दिल्लीतील व्यक्तीला मोपा पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. अक्षय वशिष्ठ असे त्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूतबाधा झाली असल्याचा व्हिडिओ तयार करून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल केला होता. ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी 15 सप्टेंबर रोजी पणजी येथील पोलिस कर्मचारी सुरेश शिरोडकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार मोपा विमानतळ पोलिसस्थानकात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 352( 6)3 (5) अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.

Advertisement

तपासादरम्यान संशयिताने रियल टॉप क्लिप नावाच्या फेसबुक चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केल्याचे समोर आले. या व्हिडिओला ‘गोवा का हंटर एअरपोर्ट’ असे शीर्षक देऊन त्यात मोपा विमानतळाबद्दल चुकीची माहिती आणि अंधश्रद्धा पसरवणारी माहिती दिली होती. हा व्हिडिओ लोकांमध्ये भीती आणि सार्वजनिक धोका निर्माण करण्याच्या हेतूने तयार केला होता. हा प्रकार विमानतळाची प्रतिमा खराब करण्यासोबतच तिथे प्रवास करणाऱ्या आणि काम करणाऱ्या लोकांच्या मनात भीती निर्माण करणारा होता. अशा प्रकारचे व्हिडिओ समाजात गैरसमज आणि अशांतता पसरवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. संशयित सोशल मीडियावर अज्ञात राहून काम करत असल्यामुळे त्याला शोधणे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान होते. परंतु काही सूत्राकडून मिळाल्या माहितीनुसार तो दिल्लीमध्ये राहत असल्याचे पोलिसांना कळले. त्याला तात्काळ पकडण्यासाठी गोवा पोलिस अधिकाऱ्यांनी एक विशेष पथक तयार केले.

या पथकात पोलिस उपनिरीक्षक विराज सावंत आणि पोलिस कर्मचारी रविचंद्र बंडी वरडकर यांचा समावेश होता. पथकाने कोणताही विलंब न करता दिल्ली गाठून संशयिताचा शोध घेतला. अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी त्याला दिल्लीतील द्वारका येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी गोव्यात आणले. काल संध्याकाळी त्याला मोपा पोलिसांनी अटक केली. ही संपूर्ण कारवाई मोपा पोलिस निरीक्षक नारायण चिमुलकर, पेडणे पोलिस उपअधीक्षक सलीम शेख आणि उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पार पडली.

Advertisement

Advertisement
Tags :

.