आर्थिक वाढीचा अंदाज 7 टक्के राहण्याचे मूडीजचे संकेत
2022 साठी भारताकरीता अंदाज सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज 2022 साठी 7.7 टक्क्यांवरून कमी करत तो 7 टक्क्यांवर आणला. देशांतर्गत वाढता व्याजदर आणि मंद जागतिक विकासाचा भारताच्या आर्थिक गतीवर परिणाम होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
मूडीजने भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज कमी करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी मे महिन्यात, मूडीजने 2022 साठी भारताचा आर्थिक विकास दर 8.8 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता, जो सप्टेंबरमध्ये 7.7 टक्क्यांवर सुधारला होता. त्यानंतर आता हा नवीन अंदाज नोंदवला आहे.
2023-24 च्या व्यापक जागतिक दृष्टिकोनामध्ये, मूडीजने म्हटले आहे की, 2022 साठी भारताची वास्तविक जीडीपीत वाढ 7.7 टक्क्यांवरून सात टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकणार असल्याचेही भाकीत केले आहे.
उच्च चलनवाढ, उच्च व्याजदर आणि मंदावलेली जागतिक वाढ यांचा आर्थिक विकासावर परिणाम होणार असल्याचे सांगताना मूडीजने 2023 मध्ये वाढ 4.8 टक्के होईल, त्यानंतर 2024 मध्ये 6.4 टक्क्यांपर्यंत वाढत जाणार असल्याचेही नमूद केले आहे.