मूडीजकडून जीडीपी अंदाजामध्ये कपात
2025 मध्ये 6.3 टक्के राहणार आर्थिक वाढ
नवी दिल्ली :
जागतिक रेटिंग एजन्सी मूडीज यांनी 2025 साठी भारताचे सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) अंदाज हा 6.5 टक्क्यांनी घटून तो मंगळवारी 6.3 इतका केला आहे. रेटिंग एजन्सी मूडीजने म्हटले आहे की, यूएस ट्रेड पॉलिसीमध्ये असणारी अस्थिरता आणि ट्रेड बॅरियर्सच्या माध्यमातून जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे.
मूडीजने त्यांच्या ‘ग्लोबल मॅक्रो आउटलुक’ 2025-26 (मे आवृत्ती) मध्ये म्हटले आहे की भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावासारख्या भू-राजकीय तणावांचा त्यांच्या वाढीच्या दृष्टिकोनावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. मूडीजने म्हटले आहे की गुंतवणूक, विस्तार आणि/किंवा वस्तूंच्या सोर्सिंगचा निर्णय घेताना गुंतवणूकदार आणि व्यवसायांसाठी खर्च वाढण्याची अपेक्षा आहे कारण ते नवीन भू-राजकीय परिस्थिती विचारात घेतात.
2026 साठी 6.5 टक्के अंदाज
मूडीजने 2025 च्या कॅलेंडर वर्षासाठी भारताचा विकासदर अंदाज 6.3 टक्के केला, परंतु 2026 साठी तो 6.5 टक्के ठेवला. 2024 मध्ये 6.7 टक्के वाढीपेक्षा हा कमी आहे. मूडीजला अपेक्षा आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) विकासाला चालना देण्यासाठी रेपो दरामध्ये आणखी कपात करेल.
‘या वर्षाच्या सुरुवातीला आर्थिक वाढ मंदावून संभाव्य दरावर परत येण्याची अपेक्षा होती. धोरणातील बदल आणि पूर्वीपेक्षा जास्त धोरणात्मक अनिश्चितता यामुळे आम्ही 2025 आणि 2026 साठी आमचे जागतिक विकासदर अंदाज आणखी कमी केले आहेत, विशेषत: अमेरिका आणि चीन या दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये,’ असे रेटिंग एजन्सीने म्हटले आहे.
मूडीजने म्हटले आहे की धोरणात्मक अनिश्चिततेमुळे 2025 मध्ये वाढ आणखी मंदावण्याची शक्यता आहे आणि याचा ग्राहक, व्यवसाय आणि आर्थिक क्रियाकलापांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
जागतिक विकास कसा असेल?
मूडीजने अमेरिकेसाठीचा जीडीपी वाढीचा अंदाज 2025 मध्ये 1 टक्के आणि 2026 मध्ये 1.5 टक्के केला आहे, जो आधी 2 टक्के आणि 1.8 टक्के होता. या तुलनेत, 2024 मध्ये 2.8 टक्के वाढ झाली. चीनसाठी, 2025 मध्ये 3.8 टक्के आणि 2026 मध्ये 3.9 टक्के वाढ अपेक्षित आहे, जी 2024 मध्ये 5 टक्के होती.