कैफियत...
एकदा स्वर्गाच्या दारावर फार मोठा मोर्चा निघाला. देव अगदी गडबडून गेले. दारावरची सुरक्षा व्यवस्था वाढवली. माणसं पृथ्वीवरती गाढवासारखी मोर्चे काढतात हे देवानं ऐकलं होतं. या मोर्चांसाठी कुणालाही बोलवायला लागत नाही, प्रत्येक जण आपापल्या बिरादरीप्रमाणे तिथे हजर होतोच. पण असे मोर्चे खूप अडचणी निर्माण करतात, हेही देवांनी ऐकलं होतं. पण स्वर्गावर ही वेळ येईल असं काही वाटलं नव्हतं. मोर्चा नेमका कोणाचा आणि कोणत्या कारणासाठी आहे हे शोधायला एका सेवकाला त्यांनी पाठवलं. पण प्रचंड गर्दी असल्यामुळे आणि धूळ खूप उडत असल्यामुळे काही कळेना झालं. आवाज इतके भयंकर येत होते की भूतपिशांचा मोर्चा असावा असेही वाटत होते. शेवटी देव शांतपणे ह्या मोर्चाला सामोरे जायला निघाले. देव समोर येतात म्हटल्यानंतर मोर्चा आपोआप थांबला. आणि हळूहळू धुळ खाली बसली आणि मग लक्षात आलं की गाढवांचा मोर्चा आला आहे. कठीणच आहे! प्रत्यक्ष गाढवांना मोर्चा काढायचं शहाणपण आलं म्हणजे कौतुकच करायला हवं. पण असो. गाढवांचा प्रमुख पुढे आला आणि सांगायला लागला... देवा माणसांच्या बरोबरच तू आमची निर्मिती केलीस पण आमच्यावर असा अन्याय का? आमचं पिल्लू आणि माणसाचं बाळ लहानपणी गोंडसच असतात, त्यांचा वेडेपणा किंवा गाढवपणा त्यांच्या वयाबरोबरच वाढतच जातो, हे पण आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे. आम्हाला शिक्षणाची साथ नाही आणि माणसाला मात्र तेवढी शिक्षणाची साथ दिलीस. पण माणूस शिकूनसुद्धा वेड्यासारखाच वागतो हे तू पाहिलंस मग आम्हाला तरी शिकव नाहीतर माणसांची तरी शाळा बंद कर! नाहकच तुझ्या डोक्यावरचा खर्च वाढवतायेत......आम्ही गाढवं कचरापेटीत लोळतो, लोळतांना चित्र विचित्र आवाज काढतो, पण जगात अशी हजारो आळशी माणसं आहेतच की घराची कचरापेटी करुन ते लोळत पडलेले असतात. आम्हाला निदान त्यांच्यासारख्याच सवलती तरी दे...गाड्या, बंगले, घर दार......
आम्हालाही त्यांच्यासारखं घर पाहिजेच.....आम्हाला कित्येकदा कचरापेटीजवळ दारू पिऊन लोळणाऱ्यांजवळ जायला लागतं, अशावेळी ते आमच्या जवळचे नातेवाईक वाटतात. खरं तर तू जगात दोनच जाती तयार केल्यास एक म्हणजे कष्टाळू आणि दुसरं म्हणजे आळशी...एक म्हणजे माणूस आणि दुसरं गाढव.. पण एकाला झाकावं आणि दुसऱ्याला बघावं इतके सगळे सारखे वागत असतात.
(पूर्वार्ध)