महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मूड महाराष्ट्राचा

06:30 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एका नामांकित व्यावसायिक कंपनीने विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्रातील जनमताचा सर्वे करुन त्याचे तपशील जाहीर केले आहेत. हे तपशील सांगतात, महाआघाडीला सुमारे 160 जागा मिळतील व कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची महाविकास आघाडी सत्तेवर येईल. अर्थात हे अंदाज आहेत ते निवडणुकीपर्यंत बदलू शकतात आणि अशा अंदाजांचे काय होते हे लोकसभा निवडणुकीच्यावेळी दिसून आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निकाल हेच खरे. तरीपण राजकीय नेत्यांना धोरणे ठरविताना, जागावाटप करताना, आतली टांग मारताना आणि व्यूहरचना करताना असे जनमत चाचणी अहवाल महत्त्वपूर्ण ठरत असतात. महाराष्ट्रातील लोकसभा निकालानंतर भाजपा आणि महायुतीने वेगळी व झपाट्याने पावले उचलायला प्रारंभ केला होता. लाडकी बहीण आणि शेतीला मोफत वीज हे कळीचे मुद्दे ठरावेत अशी योजना करण्यात आली. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजप यातील अंतर कमी करुन काही ज्येष्ठ स्वयंसेवकास प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीत बचत गटाच्या महिलांचा तगडा मेळावा भरवून लाडकी बहीण योजना विस्तारण्यात आली. इतके करुनही महाराष्ट्राचा मूड दिसतो आहे तो महाआघाडी 160 जागा जिंकणार असा. ओघानेच नव नव पवित्रे घेतले जात आहेत आणि सत्तेत आपण असू आणि मुख्यमंत्रीपद आपणासच मिळाले पाहिजे यासाठी सर्वच पातळीवर बेत रचले जात आहेत. पाच तारखेला सांगली जिल्ह्यात कडेगांव येथे दिवंगत नेते डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मारकाचे उदघाटन आणि जनमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील आदी प्रभूती हजर राहणार आहेत. एका अर्थाने हा मेळावा महाआघाडीचा प्रचार मेळावा तर होणार आहेच. जोडीला डॉ. विश्वजित कदम यांचे नेतृत्व उद्याच्या स्पर्धेत अग्रभागी नेण्यात महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. विश्वजीत कदम कॉंग्रेस पक्षाशी व गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ आहेत. पक्षासाठी प्रसंगी ते सांगली पॅटर्न करतात पण हित कॉंग्रेसचे, महाआघाडीचे साधतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. महाआघाडीत मोठा भाऊ कॉंग्रेस राहणार आणि निकालानंतर कोण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते सोनिया गांधी ठरवणार अशी कॉंग्रेसची भूमिका आहे. पाच तारखेचा मेळावा त्यादृष्टीने महत्त्वाचा ठरेल व विश्वजित कदम यांचे नेतृत्व उजळून निघेल हे वेगळे सांगायला नको. दरम्यान महाआघाडीत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे महाआघाडीचा चेहरा जाहीर करा आणि सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट करा यासाठी आग्रही आहेत. उद्धव ठाकरे यांना मोठा भाऊ व मुख्यमंत्री म्हणून संधी जाहीर करणार नसाल तर  सगळा विरोध आणि सर्व 288 उमेदवार डोक्यावर घेऊन राज्यभर नाचायची गरज काय असा सवालही त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी विचारताना दिसत आहेत ओघानेच ऑलवेल नाही. उद्धव ठाकरे दिल्लीवारी करुन आले पण काँग्रेसनेते त्यांना महाआघाडीचे मुख्यमंत्री असं प्रोजेक्ट करायला तयार नाहीत. ओघानेच उद्धव ठाकरे असोत, अजितदादा पवार असोत ही मंडळी आपल्या शिवाय राज्यात सत्ता स्थापन होणार नाही यासाठी खेळी करणार हे उघड आहे. शरद पवार आजवर तेच करत आले आहेत. त्यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं आहे, भाजपकडून विशेषत: संघ परिवाराकडून नितीन गडकरी यांना महाराष्ट्रात आणलं जाऊ शकतं आणि देवेंद्र फडणवीस दिल्ली दरबारी पाठवले जातील पण एकुणच निवडणूकीपूर्वी नदीतून भरपूर पाणी वाहिलंय हे स्पष्ट आहे. राज्यात नव्याने डाव मांडताना अजितदादा व शरद पवार एकत्र येणार का? एकनाथजी शिंदे व उद्धव ठाकरे एका महायुतीत येणार का? शरद पवार यांची अंतिम खेळी काय राहील याचा कोणालाच अंदाज नाही. एकमात्र दिसते आहे सर्वत्र बहुरंगी लढती होतील. मराठा आरक्षण आणि लाडकी बहीण हे गेमचेंजर मुद्दे बनतील. निवडणूक पूर्व अलायन्स आणि नंतरचे धोरण यात कोण कुणाचा कायमचा मित्र नाही हे दिसून येईल आणि तुकड्या तुकड्यात पक्ष, संघटना एकत्र येऊन सत्ता हिसकावत राहतील. जरांगे काय करतात की देवेंद्र फडणवीस यांना घरी बसवणे हाच त्यांचा हेतू राहणार, ते सर्वत्र अपक्ष उमेदवार उभे करणार की कुणाशी हातमिळवणी करणार हे बघावं लागेल. ओबीसी समाज विशेष करुन धनगर, माळी, वंजारी अस्वस्थ आहेत. हा समाज आणि मागास, इतर मागास समाज ओबीसी आरक्षण बचाव परिषदांच्या माध्यमातून एकवटतांना दिसतो आहे. तर मुस्लीम समाज एक गठ्ठा भाजपा विरोधी भूमिकेत आहे. ओघानेच महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा, समरसता आणि गावगाडा अडचणीत आले. या सर्व स्थितीला शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार आहे असं सांगत राज ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. महाराष्ट्रात लाडकी बहीण गाजत असतानाच महिला, मुली यांच्यावरील अत्याचार, बलात्कार अशी प्रकरणे पाठोपाठ पुढे येत आहेत. सिंधुदुर्गमधील महाराजांचा पुतळा पडणे हे महायुतीला भारी पडताना दिसत आहे. एकूणच रोज नवनवे चित्र पुढे येत आहे आणि बुडत्याचा पाय खोलात जातो आहे. महापुरुषांचा पुतळा उभा करताना आम्ही पुरेशी काळजी घेणार नाही. महिलांची सुरक्षा नीट ठेवणार नाही आणि सवंग जातीपातीचं उथळ आणि राज्यहिताला बाधक भूमिका घेणार असू तर लोकांना नवे पर्याय शोधावे लागतील. आजचे सारे एकाच माळेचे मणी आहेत आणि तोच महाराष्ट्राचा मूड आहे. राज्यभर पावसाची बॅटिंग सुरू आहे. शरद पवार अॅक्शनमूडवर आले आहेत. हर्षवर्धन पाटील, समरजीतसिंग घाडगे असे काही त्यांच्या छावणीत दाखल होतील असे वाटते. प्रत्येक मतदारसंघात पारंपारिक लढती आहेतच. दोन तलवारी एका म्यानात राहात नाहीत. त्यामुळे हे होणारच ही सुरवात आहे. जागावाटपानंतर या उड्या आणखी वाढणार. धक्यावर धक्के बसणार आहेत पण या दरम्यान गणपती आहे. तो निर्विघ्न व शांतता सलोख्याने पार पडणे ही कसोटी आहे. अस्वस्थ वातावरणात, असुरक्षितता आणि जाती धर्मात विभागत चाललेला गावगाडा यामुळे भीती वाटावी अशी स्थिती आहे. जनतेने राजकारण थोडं बाजूला ठेवून, राजकारण्यांना थोडं मागे हटवून सामाजिक ऐक्य, सलोखा, बंधुभाव आणि सुरक्षितता यावर भर दिला पाहिजे. निवडणुका येतील जातील, सत्ता येईल जाईल पण फाटलेली मने आणि उसवलेला गावगाडा सुरळीत करणे कठीण जाईल. महाराष्ट्रातील संतांनी सर्वांना एकत्र आणले आहे. तीच धारा तीच परंपरा पुढे न्यावी लागेल तोच महाराष्ट्राचा मूड असला पाहिजे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article