शिवरायांच्या विचारांची स्मारकेही उभी राहावीत...
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. महाराष्ट्राएवढीच गोमंतकातही शिवप्रेमाची परंपरा जोपासली जाते. शिवछत्रपती व गोव्याचे नाते अतूट असून इतिहासातील तो एक स्वतंत्र अध्याय म्हणावा लागेल. किंबहुना पोर्तुगीजांच्या जुलुमी राजवटीखाली दबलेल्या गोमंत प्रदेशाला मुक्त करण्याचा ध्यास घेणारे शिवराय हे पहिले राजे होते. येथील हिंदू धर्म, प्राचीन मंदिरे व संस्कृतीला त्यांच्यामुळेच अभय मिळाले. त्यामुळे हिंदवी स्वराज्यातील शिव-गोमंतक पर्व हे स्वतंत्र अभ्यासाचा, संशोधनाचा आणि स्वाभिमानाचा विषय ठरतो.
फर्मागुडीच्या किल्ल्यावर राज्यस्तरीय शिवजयंती उत्सव प्रतिवर्षीप्रमाणे तेवढ्याच दिमाखात साजरा झाला. सुऊवातीला राज्यस्तरीय उत्सवांबरोबरच अन्य एक-दोन ठिकाणी शिवजयंती थोडक्यात साजरी होत असे. आता प्रत्येक तालुक्यासह गावोगावी आणि शाळा, महाविद्यालयांत शिवमय वातावरणाने संपूर्ण माहोल भारावून जातो. शोभायात्रेसह शिवरायांचा जयघोष करणाऱ्या मिरवणुका प्रत्येक शहरातून निघतात. प्रत्येक वर्षी शिवजयंतीला राज्यात एक-दोन ठिकाणी शिवरायांचे नवीन पुतळे उभे राहतात. यावर्षी उसगाव येथे राज्यातील सर्वांत उंच अशा पुतळ्याचे अनावरण शिवजयंतीच्या साक्षीने झाले. शिवप्रेमींच्या प्रेरणेतून महाराजांचे मंदिरही उभारण्याचे प्रयोजन आहे. शिवभक्तीची ही प्रेरणा गोमंतकीयांमध्ये तशी जुनीच असून हल्ली हा प्रेमादर जल्लोषपूर्ण वातावरणातून व्यक्त होत आहे.
हिंदवी स्वराज्याचा अर्थात शिवशाहीचा इतिहास महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांतून जसा घडला तसा गोव्याच्या विशाल समुद्राची किनारही या इतिहासाला लाभली आहे. शिवरायांनी तब्बल तीनवेळा गोव्यावर स्वारी केली. पोर्तुगीजांच्या धर्मच्छलात जखडलेल्या गोव्याला पाशवी अत्याचारातून मुक्त करण्याचा त्यामागे उद्देश होता. या इतिहासाचे साक्ष देणारे गड-किल्ले जसे शाबूत आहेत तसे ऐतिहासिक दस्तऐवजही सापडतात. गोव्याच्या दक्षिणेला असलेला बेतुल हा जलदुर्ग शिवाजी महाराजांनी उभारलेला शेवटचा किल्ला असल्याची नोंद मिळते. याशिवाय काब-द-राम, फोंडा किल्ला अशा ऐतिहासिक वास्तुही त्याची साक्ष देतात. यवनांच्या आक्रमणात उद्ध्वस्त करण्यात आलेल्या नार्वेच्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा शिवाजी महाराजांनी केलेला जीर्णोद्धार हा इतिहास सर्वज्ञात आहे. शिवरायांचा हा निग्रह पुढे नेताना छत्रपती संभाजी राजांनी फोंड्यातील मर्दनगड जिंकून फर्मागुडीच्या टेकडीवर गुढी उभारीत पोर्तुगीजांना काढलेले फर्मान, हा गोव्याला अभय देणारा कळसाध्याय होता. साडेतीनशे वर्षांपूर्वी दोन्ही छत्रपतींनी परकीय सत्तेपासून गोवामुक्तीचे उराशी बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकले नाही पण त्यातून तिसवाडी, बार्देश, सासष्टी हे तालुके पादाक्रांत केलेल्या पोर्तुगीजांच्या, संपूर्ण गोव्यावर धर्मांतराचा वरवंटा फिरवण्याच्या मनसुब्यांना चाप बसला. हा इतिहास गोव्यातील विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी शिक्षकांनी उचलावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिवजयंती उत्सवाच्या व्यासपीठावरून केले. मुख्यमंत्र्यांनीच ही घोषणा केल्याने शिक्षण खात्यालाही अभ्यासक्रमात प्राधान्यक्रमाने ही तजविज करावी लागेल.
गोमंतकीयांमध्ये शिवप्रेमाची प्रेरणा वादातीत आहे. तरीही दुर्दैवाने काही वाद निर्माण करणाऱ्या कलुषित प्रवृत्तीही अधूनमधून डोके वर काढतात. अज्ञानातून आलेला द्वेष समजला जाऊ शकतो पण पूर्वग्रहातून पसरविला जाणारा विद्वेष सामाजिक गटबाजीला प्रवृत्त करणारा आहे. काहींना छत्रपती हिंदूचे राजे तर काहीजणांना ते मराठा साम्राज्याचे नृपती वाटतात. महापुरुषाचे एवढ्या संकुचित व थिट्या नजरेतून मूल्यमापन होऊ शकत नाही. शिवरायांच्या संकल्पनेतील ‘हिंदवी स्वराज्य’ हे जाती धर्मापलीकडे एका राष्ट्राचा विचार करणारे होते. या कल्याणकारी राज्यात प्रजेला सुरक्षा, सन्मान, न्याय व नितीमत्तेची हमी होती. सर्वसामान्यांमध्ये आत्मसन्मान जागृत करून उभारलेले असामान्य असे हे आदर्श राज्य होते. त्यात अठरापगड जाती व अन्य धर्मियांना अभयाची हमी होती. हिंदवी स्वराज्याच्या उभारणीमध्ये कैक जाती-धर्मांच्या लोकांनी रक्त सांडले असून हा इतिहास दुर्लक्षित करता येणार नाही. शिवाजी महाराजांचे राजेपण हे धाक, संपत्ती व ऐश्वर्यापेक्षा जनतेच्या मनात होते. शिवछत्रपतींचा विद्वेष करणाऱ्यांनी व भक्तगणांनीही हा इतिहास जाणून घेतला पाहिजे.
शिवाजी महाराजांची जयंती आज गोवा व महाराष्ट्रासह देशभरात आणि विदेशातही साजरी होणे, याहून मोठी अभिमानाची गोष्ट नाही. शिवभक्ती व अभिमान जोपासण्यासाठी पुतळे व स्मारकांच्या पलीकडे जाऊन आदर्श राज्यकारभाराचे धडेही आचरणात यायला हवेत. ऐतिहासिक नाटकातून आणि चित्रपटातून शिवराय जसे घरोघरी पोहोचतात, तसे ग्रंथ साहित्य, वास्तूकला, चित्रकारिता, शिल्पकला अशा सर्वच कलांमधून या महापुऊषाचे जीवनकार्य जनतेपुढे आले पाहिजे. मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक कलेतून त्यांचे विचार व्यक्त होणे, अधिक संयुक्तिक होईल. शिवरायांची स्मारके जरूर मोठी व व्यापक व्हावीत पण त्याहून त्यांचे विचार तेवढेच मोठे झाल्यास शिवराय कळल्याचे समाधान मोठे असेल. शिवजयंतीच्या शोभायात्रांमधून एका दिवसाचे शिवप्रेम ठीक आहे पण शक्तीप्रदर्शनातून घडणाऱ्या कृती अशा महापुरुषांचा अनादर करणाऱ्या ठरतील, याचे भानही तेवढेच महत्त्वाचे आहे. महापुरुषांचे विचार समाजाच्या कल्याणासाठी असावेत. त्यात कुठल्या एका विशिष्ट गटाचा द्वेष करणाऱ्या विकारांना थारा नसावा. शिवजयंती साजरी करताना छत्रपतींच्या विचारांचीही स्मारके उभी राहावीत, ज्यातून पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा, प्रोत्साहन आणि आदर्श जीवनमूल्यांचे धडे मिळतील...!
सदानंद सतरकर