For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोन्सेरातांची राजकीय घराणेशाही संपविणार

12:58 PM Feb 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोन्सेरातांची राजकीय घराणेशाही संपविणार
Advertisement

उत्पल पर्रीकर यांच्या ‘आमी पणजेकार’ पॅनलचा निर्धार : सर्व प्रभागात स्वच्छ उमेदवार उतरविणार

Advertisement

पणजी : बाबुश मोन्सेरात कुटुंबाची राजकीय घराणेशाही संपविणे हा पणजी महानगरपालिका निवडणुकीत पॅनल उभे करण्यामागील मुख्य उद्देश आहे, असे प्रतिपादन उत्पल पर्रीकर यांनी केले आहे. पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत उतरणार असलेल्या ‘आमी पणजेकार’ या पॅनलची घोषणा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, वैदेही नाईक यांच्यासह मिनीन डिक्रुज व दत्तप्रसाद नाईक यांची उपस्थिती होती.

मोन्सेरातांची एकहाती मक्तेदारी

Advertisement

मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी एकहाती मक्तेदारी चालविलेल्या पणजी मनपामधील त्यांचे वर्चस्व संपविणे हे आपले मुख्य ध्येय असल्याचे पर्रीकर म्हणाले. वडील मंत्री, आई आमदार आणि पुत्र महापौर अशी तीन मतदारसंघात तिघांनी सत्ता काबीज करून ज्याप्रकारे राजकीय घराणेशाही चालविली आहे, त्यातून लोकांचा उद्वेsग वाढत आहे.

पणजीत समस्याच समस्या

ठराविक लोक वगळता इतरांची कामे एकतर होत नाहीत किंवा अडवून ठेवली जातात, याशिवाय अनेक प्रश्नही कित्येक वर्षांपासून जैसे थे आहेत, राजधानी असूनही लोकांना पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मिळत नाही, खाण्यायोग्य मासळी मिळत नाही, वाहतूक कोंडी सुटत नाही, अशा अनेक समस्या अद्याप सुटण्याच्या प्रतिक्षेत आहेत, असे फुर्तादो यांनी सांगितले. आपण महापौरपदी असताना राजधानीतील अनेक समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले, त्या मार्गी लावल्या, असे त्यांनी पुढे सांगितले.

उमेदवार योग्यवेळी जाहीर करणार

निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया प्रारंभ झाली तरीही ‘आमी पणजेकार‘ पॅनलने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाही, यामागील कारण काय, असे विचारले असता, तो आमच्या राजकीय रणनीतीचा भाग असल्याचे पर्रीकर म्हणाले. आमचे सर्व 30 उमेदवार निश्चित झालेले आहेत, तरीही आताच त्यांची नावे जाहीर केल्यास त्यांच्यावर राजकीय दडपण, दबाव येऊ शकतो, आमिषे दाखविली जाऊ शकतात, अशी भीती असल्याने सर्व नावे योग्यवेळी जाहीर करण्यात येतील, असे पर्रीकर यांनी सांगितले.

आपले वडील गोव्याचे मुख्यमंत्री होते, नंतर केंद्रात संरक्षणासारख्या सर्वोच्च स्थानी मंत्रीपदी विराजमान झाले. परंतु तरीही एक पूत्र म्हणून त्यांच्या त्या पदांचा कोणताही लाभ आपण घेतला नाही. वडिलांचा राजकीय वारसा असला तरी आज आपण केवळ पणजीचा एक नागरिक या नात्याने निवडणूक लढवत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कॅसिनोंच्या विषयावर यापूर्वीच आपण बोललेलो आहे, असे सांगत अधिक बोलणे त्यांनी टाळले.

सगळेच मतदार विकावू नसतात...

विद्यमान राजकारणात एक तर उमेदवार विकले जातात किंवा मतदारांना पैसे मोजून स्वत:च्या बाजूने वळविले जातात, अशावेळी तुमच्या उमेदवारांची समर्थनीय बाजू कोणती, असे विचारले असता, स्वत:बरोबरच आपल्या नेत्यावरील विश्वास हीच त्यांची ओळख आणि जमेची बाजू असल्याचे पर्रीकर म्हणाले. आपण विधानसभा निवडणूक लढविली तेव्हा कोणत्याही मतदाराला पैसे दिले नाहीत. तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणात मते मिळविली. यावरून सगळेच मतदार विकावू नसतात, हा त्याचा पुरावा, असल्याचे त्यांनी सांगितले.

‘आमी पणजेकार’ला काँग्रेसचा पाठिंबा : पाटकर

उत्पल पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या आमी पणजेकार पॅनलला काँग्रेस पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी यासंदर्भात बोलताना आमी पणजेकार पॅनलला काँग्रेस पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर हे पॅनल सत्तेवर आल्यास महापौर म्हणून सुरेंद्र फुर्तादो यांची वर्णी लावण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.