रेबीज नियंत्रणासाठी महिनाभर श्वानांचे लसीकरण
जागतिक रेबीज दिनानिमित्त पशुसंगोपन खात्याची मोहीम : जिल्ह्यात 77 हजार श्वान संख्या
बेळगाव : श्वानाच्या चाव्यामुळे नागरिकांना होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बेळगाव जिल्हा रेबीजमुक्त करण्यासाठी व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात येत आहे. आज 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिनानिमित्त पुढील महिनाभर म्हणजेच 28 ऑक्टोबरपर्यंत श्वानांना मोफत प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. तसेच रेबीजबाबत शाळा स्तरावर व इतर ठिकाणी जनजागृती केली जाणार आहे. जिल्ह्यात 14 लाख मोठ्या पाळीव जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये 77 हजार 280 श्वान आहेत.
या सर्व श्वानांना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट पशुसंगोपनने ठेवले आहे. अलीकडे कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. यामध्ये अनेकांना जीवही गमवावा लागत आहे. यासाठी यंदा खात्यामार्फत तब्बल एक महिना सर्व श्वानांना प्रतिबंधक लस टोचली जाणार आहे. जिल्ह्यात 300 हून अधिक पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या सर्व दवाखान्यांमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे. जिल्ह्यात 77 हजार तर एका बेळगाव तालुक्यात 9 हजार 080 श्वानांची संख्या आहे. यामध्ये दरवर्षी भर पडू लागली आहे. पाळीव श्वानांचे लसीकरण होत असले तरी भटकी कुत्री मात्र वंचित राहू लागली आहेत आणि भटक्या कुत्र्यांकडूनच मानव आणि जनावरांवर हल्ले होऊ लागले आहेत. यासाठी प्रशासनाने उपाययोजना राबवून भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करणे काळाची गरज आहे.
भटक्या कुत्र्यांना कोण घालणार वेसण?
बेळगाव शहरात 20 हजाराहून अधिक भटकी कुत्री आहेत. दरवर्षी यामध्ये हजारोंनी भर पडू लागली आहे. मनपामार्फत केवळ दिखाव्यासाठी नसबंदी मोहीम राबविली जाते. मात्र, प्रत्यक्षात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. या कुत्र्यांना वेसण कोण घालणार? असा प्रश्नही सर्वसामान्यांना पडू लागला आहे. अलीकडे प्रतिष्ठा आणि शौक म्हणून श्वान पाळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये जर्मन शेफर्ड, लॅबेडोर, डॉबरमॅन, मुधोळ हाऊंड, पामेरियन, सायबेरियन हस्की, डॅशहाऊंड, रॉटविलर, बेल्जियम शेफर्ड आदी देशी-विदेशी जातींचा समावेश आहे. या सर्व श्वानांना मोफत लस दिली जाणार आहे.
प्राणीप्रेमी आणि प्राणीदया संघटनांनी पुढाकार घेण्याची मागणी
रेबीज या प्राणघातक रोगाबाबत जनमानसात जागृती केली जात आहे. तयामुळे श्वानांना लसीकरण करून घेण्याचे प्रमण हळूहळू वाढू लागले आहे. त्यामुळे रेबीज नियंत्रणात येऊ लागला आहे, ही सर्वांसाठीच दिलासादायक बाब आहे. मात्र, भटकी कुत्री लसीकरणापासून वंचित रहात आहेत. ही चिंताजनक बाब आहे. यासाठी प्राणीप्रेमी आणि प्राणीदया संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात रेबीजच्या अटकावासाठी महिनाभर प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जात आहे. 28 ऑक्टोबरपर्यंत सर्व श्वानांना मोफत लस टोचली जाणार आहे. जिल्हा रेबीजमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. श्वानपालकांनी सहकार्य करावे.
- डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक पशुसंगोपन खाते)
जिल्ह्यातील तालुकानिहाय कुत्र्यांची संख्या
- तालुका श्वानांची संख्या
- अथणी 10 हजार 793
- बैलहोंगल 2 हजार 428
- बेळगाव 7 हजार 709
- चिकोडी 7 हजार 870
- गोकाक 5 हजार 646
- हुक्केरी 5 हजार 480
- कागवाड 1 हजार 721
- खानापूर 4 हजार 492
- कित्तूर 800
- मुडलगी 2 हजार 568
- निपाणी 1 हजार 758
- रायबाग 12 हजार 145
- रामदुर्ग 5 हजार 950
- सौंदत्ती 5 हजार 544
- यरगट्टी 2 हजार 376
- एकूण 77 हजार 280