For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मान्सूनचे वारे

06:30 AM May 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
मान्सूनचे वारे
Advertisement

भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशाकरिता मोसमी पाऊस अत्यंत महत्त्वाचा. देशातील 60 ते 65 टक्के जनता आजही शेतीवर अवलंबून असून, या शेतीचे भरण, पोषण या पावसावरच होते. स्वाभाविकच मान्सूनचे आगमन, पुढील वाटचाल आणि एकूणच प्रमाण याचा फार मोठा परिणाम शेतीसह सर्वच घटकांवर होतो. हे पाहता मान्सून त्याच्या निर्धारित वेळेतच अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होण्याचा अदमास ही सुवार्ताच. सर्वसाधारणपणे मान्सून 18 ते 19 मेदरम्यान अंदमान-निकोबार बेटांवर सक्रिय होतो. यंदादेखील तो याचदरम्यान बेटांवर दाखल झाल्यास देवभूमी केरळमध्येही त्याचे 1 जूनच्या आसपास आगमन होण्याची शक्यता बळावेल. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, महाराष्ट्रापर्यंतचा त्याचा प्रवासही सुकर होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. खरे तर मोसमी पाऊस स्थिरस्थावर होईपर्यंत आणि पेरण्या उरकेपर्यंत जून महिना उलटतो. त्या अर्थी शेतीच्या दृष्टीने जुलै महिना अधिक महत्त्वाचा असेल. यंदा एल निनोचा प्रभाव हा प्रामुख्याने ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांवर राहण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता या दोन महिन्यांमधील पावसाची सरासरी महत्त्वाची असेल. यंदा प्रशांत महासागरात निर्माण होणारा एल निनो हा अधिक प्रभावकारी असल्याने तो सुपर एल निनो ठरणार असल्याचे हवामानतज्ञांचे मत आहे. ही धोक्याची घंटाच म्हणता येईल. प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या गरम पाण्याच्या प्रवाहांना एल निनो म्हणतात. हे प्रवाह नैत्य मोसमी वारे भारताच्या दिशेने घेऊन येत असलेले बाष्प खेचून घेत असल्याने भारतीय भूमीवर पाऊस कमी पडतो. त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात एल निनोची भूमिका महत्त्वाची. साधारणपणे तीन ते चार वर्षाच्या कालावधीदरम्यान एल निनो निर्माण होतो. जल, वायू, आदी घटकांवर परिणाम होत असतो. वातावरणातील हवा कोरडी होणे, समुद्रातील पाण्याचे तापमान वाढणे, भूमी तापणे हे त्याचे सर्वसाधारण परिणाम. त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होते. 1950 पासूनचा विचार करता आतापर्यंत 27 एल निनोची निर्मिती झाली आहे. यातील पाच एल निनो हे सुपर एल निनो ठरले आहेत. यापूर्वी 11 वर्षांपूर्वी 2015-16 साली सुपर एल निनो निर्माण झाला होता. तसेच 2023-24 साली एल निनो उद्भवला होता. यातील बहुतेक वर्षे ही अवर्षणग्रस्त किंवा दुष्काळग्रस्त ठरल्याचा इतिहास आहे. त्यामुळे चिंतेचे ढगही अवतीभवती दाटलेले दिसतात. शेती, उद्योग, पिण्याचे पाणीच नव्हे, तर देशाची अर्थव्यवस्था सुदृढ राखण्यात मान्सूनचे प्रमाण महत्त्वाचे असते. या वर्षी हवामान विभागाने जून ते सप्टेंबरच्या कालावधीत सरासरीच्या 92 टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. ही तूट कशी भरून काढायची, हा देशापुढचा प्रयत्न असेल. हे लक्षात घेता आत्तापासूनच पावसाचे व उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे लागेल. मागील वर्षी देशात सरासरीच्या 106 टक्के पाऊस होऊनही देशाच्या अनेक भागांत सध्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. त्यामुळे सुपर एल निनोसारखी स्थिती उद्भवली, तर पाणीबाणीचे संकट ओढवण्याची भीती गडद असेल. मुख्य म्हणजे भारतीय हिवाळ्यावरदेखील सुपर एल निनोचा परिणाम होऊ शकतो. याशिवाय तीव्र एल निनोच्या काळात पूर्व आणि मध्य पॅसिफिकमधील चक्रीवादळाचा हंगाम सामान्यत: अधिक सक्रिय राहण्याचा संभव आहे. खरे तर पावसाचा सांगावा हा आनंदाचा क्षण. आनंदाचे प्रतीक म्हणूनच आपण पावसाकडे पाहतो. परंतु, यंदाच्या मोसमी वाऱ्यांना म्हणजेच पावसाला चिंतेचीही किनार दिसते. हे चिंतेचे ढग दूर सारण्याचे आपल्यापुढे आव्हान असेल.

Advertisement

Advertisement
Tags :

.