For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोकणात वर्षा पर्यटन बहरतंय, पण शिस्तीचे काय?

06:55 AM Aug 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
कोकणात वर्षा पर्यटन बहरतंय  पण शिस्तीचे काय
Advertisement

कोकणात सध्या वर्षा पर्यटन बहरलंय. पण, कोकणातील वर्षा पर्यटन हे केवळ निसर्गसौंदर्य अनुभवण्याचे माध्यम नाही, तर पर्यावरण संवर्धन, स्थानिक संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडलेले महत्त्वाचे क्षेत्र आहे. आंबोली, सावडाव, मांगेली, मार्लेश्वर, सवतसडा आदी निसर्गरम्य स्थळांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी पर्यटक, स्थानिक नागरिक आणि प्रशासन या तिन्ही घटकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे, तरच कोकणचे नैसर्गिक सौंदर्य टिकविता येणार आहे.

Advertisement

पावसाळा सुरू झाला, की संपूर्ण कोकण नव्या रुपात खुलून येतो. सह्याद्रीच्या डोंगर रांगा हिरव्यागार शालीने नटतात. दऱ्याखोऱ्यांतून असंख्य धबधबे फेसाळत कोसळू लागतात, तर धुक्याने वेढलेले घाट परिसर आणि समुद्र किनाऱ्यांचे रमणीय दृश्य पर्यटकांना अक्षरश: भुरळ घालतात. जून ते सप्टेंबर या कालावधीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वर्षा पर्यटनाचा हंगाम बहरात येतो. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि देशातील विविध भागांतून हजारो पर्यटक या निसर्गरम्य सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी कोकणात दाखल होत असतात. यावर्षीही गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने सर्वत्र धबधबे प्रवाहित झाले आहेत. याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे.

कोकणातील वर्षा पर्यटनासाठी सध्या सर्वच ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत असली, तरी वाढती गर्दी, वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न, पर्यावरणाची हानी आणि काही पर्यटकांचा निष्काळजीपणा यामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे वर्षा पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षितता, वाहतूक शिस्त आणि पर्यावरण संवर्धन या तीन गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य देणे ही काळाची गरज बनली आहे.सिंधुदुर्ग जिह्यातील आंबोली, सावडाव, मांगेली, नांगरतास यासह अनेक नैसर्गिक धबधबे पावसाळ्यात पर्यटकांनी गजबजून जातात. विशेषत: सोशल मीडियामुळे या ठिकाणांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Advertisement

सिंधुदुर्गातील आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय वर्षा पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते. धुक्याने वेढलेले डोंगर, कोसळणारे धबधबे, हिरण्यकेशी मंदिर, कावळेसाद पॉईंट, महादेवगड पॉईंट आणि सनसेट पॉईंट यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देत असतात. सध्या पावसाळी हंगाम सुरु असल्याने दर दिवशी मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी आंबोलीत पाहायला मिळत आहे.

मात्र, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नेहमीपेक्षा दुपटीने गर्दी होत असल्याने पार्किंगची कमतरता, वाहतूक कोंडी, रस्त्यावर अनधिकृत पार्किंग, आपत्कालीन वाहनांना अडथळा, प्लास्टिकच्या बॉटल्स आणि कचऱ्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे प्रशासन, पोलीस, वन विभाग आणि स्थानिक ग्रामस्थांना विशेष नियोजन करावे लागत असते. कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा आणि दोडामार्ग तालुक्यातील मांगेली धबधबा हे गेल्या काही वर्षांत वर्षा पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र बनले आहेत. मात्र, येथे सुरक्षित रेलिंग, पार्किंग, स्वच्छतागृहे, चेंजिंग रुम, प्रशिक्षित बचाव पथके आणि कचरा व्यवस्थापन या सुविधांची अधिक गरज जाणवत आहे. रत्नागिरी जिल्हाही वर्षा पर्यटनासाठी तितकाच प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले डोंगर, हिरवाईने नटलेली भातशेती, धुक्याने भरलेले घाट आणि भव्य धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. रत्नागिरीतील मार्लेश्वर-संगमेश्वर हे पावसाळ्यातील प्रमुख धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळ आहे. मंदिराशेजारी कोसळणारा धबधबा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण असतो. चिपळूणमधील सवतसडा धबधबा, राजापूर परिसरातील धारेश्वर धबधबा तसेच गणपतीपुळे, आरे-वारे किनारा, जयगड, खेड, लांजा, राजापूर आणि चिपळूण परिसरातील घाटरस्ते पावसाळ्यात निसर्गप्रेमींना आकर्षित करतात. मात्र, उधाणलेला समुद्र, निसरडे खडक आणि मुसळधार पावसामुळे या ठिकाणीही सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे.

धबधब्यांमध्ये अचानक पाण्याचा प्रवाह वाढणे, शेवाळामुळे निसरडे झालेले खडक, पाण्याच्या खोलीचा चुकीचा अंदाज, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याची हौस, मद्यपान करून पाण्यात उतरणे आणि मुलांकडे दुर्लक्ष करणे ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. अनेकवेळा वरच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही मिनिटांतच पाण्याचा वेग वाढतो आणि दुर्घटना घडतात. त्यामुळे पर्यटकांनीच प्रथम स्वत:च स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. कोकणचे सौंदर्य टिकवून ठेवणे ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. प्लास्टिकच्या बाटल्या, चिप्सची पाकिटे, दारूच्या बाटल्या किंवा इतर कचरा पर्यटनस्थळी टाकू नये. स्वत:चा कचरा स्वत:सोबत परत न्यावा. झाडांच्या फांद्या तोडणे, धबधब्यात साबण किंवा डिटर्जंट वापरणे तसेच मोठ्या आवाजात ध्वनी प्रदूषण करणे टाळायला हवे.

वर्षा पर्यटनामुळे स्थानिक हॉटेल व्यवसाय, होमस्टे, रेस्टॉरंट, वाहनचालक, पर्यटन मार्गदर्शक, फळविक्रेते, लघुउद्योजक आणि हस्तकला व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो. त्यामुळे पर्यटन हा कोकणच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार बनत आहे. मात्र, पर्यटनाचा विकास हा पर्यावरणपूरक आणि शाश्वत असणेही तितकेच गरजेचे आहे.

पर्यटनस्थळांवर पुरेशी पार्किंग व्यवस्था, धोकादायक ठिकाणी संरक्षक रेलिंग, प्रशिक्षित बचाव पथके, प्रथमोपचार केंद्र, सीसीटीव्ही यंत्रणा, सूचना फलक, प्लास्टिकमुक्त पर्यटन मोहीम, प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि गर्दी नियंत्रणासाठी विशेष वाहतूक नियोजन या उपाययोजना राबविल्यास पर्यटकांना वर्षा पर्यटनाचा आनंद अधिक सुरक्षित आणि सुखद होईल. कोकणात वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी पर्यटनाचा मनसोक्त आनंद घ्यावा, मात्र पर्यटनाचा आनंद घेत असताना सुरक्षितता, स्वच्छता आणि निसर्ग संवर्धनाची जबाबदारीही तेवढ्याच प्रामाणिकपणे पार पाडणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

संदीप गावडे

Advertisement
Tags :

.