Maharashtra Rain |आगामी 48 तासांत राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाचा मोठा अंदाज
मुंबई:गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होत असून, राज्यातील हवामानात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात झालेल्या तुफान पावसानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता ही प्रतीक्षा संपणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी दिली आहे. आगामी ४८ तासांत राज्यात पुन्हा एकदा ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची एंट्री होणार आहे.
विदर्भ-मराठवाड्याला इशारा, उत्तर महाराष्ट्रातही जोर वाढणार
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले आहे. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पट्ट्यात पावसाचा जोर वाढणार असून, कोकणातील रत्नागिरी भागातही मुसळधार सरी कोसळतील. विशेषतः सोमवारी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याच्या काही भागांतही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस हजेरी लावेल.
अरबी समुद्रात नव्या घडामोडी, मान्सूनचा पट्टा सक्रिय
सध्या मान्सूनची ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा उत्तर भारतात श्रीनगरपासून शाहजहानपूर आणि मुझफ्फरपूरपर्यंत पसरलेला आहे. तर दुसरीकडे पूर्व-मध्य अरबी समुद्रात तेलंगणा ते कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाची प्रणाली सक्रिय झाली आहे. त्यातच अरबी समुद्रात आणखी एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने, समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचे संकेत हवामान शास्त्रज्ञांनी दिले आहेत.
'एल निनो'चे संकट टळले; बळीराजाची चिंता मिटली
यावर्षी मान्सूनचे आगमन लांबल्याने आणि 'एल निनो'च्या सावटामुळे दुष्काळाची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, या सर्व शक्यता फेटाळत यंदा देशात मान्सूनने दमदार कामगिरी केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर पेरण्या उरकल्या असून, गेल्या काही दिवसांपासून पिके कोमेजू लागली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचे पुनरागमन होत असल्याने पिकांना जीवदान मिळणार असून बळीराजाची चिंता मिटणार आहे.
उत्तर भारतात ढगफुटीसदृश पाऊस, डोंगराळ भागात हाय अलर्ट
महाराष्ट्रात मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा असतानाच, उत्तर आणि मध्य भारताला मात्र पावसाने झोडपून काढले आहे. पूर्व आणि मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. डोंगराळ भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भूस्खलन (डोंगर खचणे) होण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून संपूर्ण यंत्रणा हाय अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे.