मान्सून दमदार, जनजीवन विस्कळीत
गोव्यातील सर्व धरणे भरली, तिराळी धरण ओव्हर फ्लो
पणजी : मान्सून सक्रिय झाला असून गोव्याला गेल्या 24 तासात झोडपून काढले. येलो अलर्ट असताना देखील मुसळधार पाऊस सर्वत्र झाला. त्यानंतर बुधवारी दुपारी हवामान खात्याने बुधवारसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. दिवसभरात गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आणि जनजीवन विस्कळीत झाले. राज्याला पाणीपुरवठा करणारे साळवली धरण यापूर्वीच भरलेले आहे, तर उत्तर गोव्यासाठी महत्त्वाचे ठरलेले ज्तराळी धरण देखील ‘ओव्हर फ्लो’ झाले. म्हैसाळ धरण प्रकल्पही ‘ओव्हर फ्लो’ झाला आहे. दक्षिण गोव्यात तसेच उत्तर गोव्यातील सांखळी, वाळपई इत्यादी भागाला पावसाने झोडपून काढले. बुधवारी येलो अलर्ट होता मात्र त्या काळातही पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून प्रथमच पावसाचा जोर जास्त प्रमाणात बुधवारी दिसून आला.
आषाढ महिना सुरू झालेला आहे आषाढ असो वा जुलै महिना या काळात मुसळधार पाऊस पडत राहतो. त्यानुसार जुलैच्या दोन तारखेलाच पावसाने गोव्याला झोडपून काढले. सत्तरी तसेच डिचोली तालुक्यात मुसळधार पाऊस आला. धारबंदोडामध्ये पावसाने कहर केलेला आहे. त्या भागात जूनपासून सुरू झालेल्या मोसमामध्ये पाऊस 50 इंच होऊन गेला आहे. राजधानी पणजीमध्ये देखील बुधवारी सकाळपासूनच जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने जोर धरला. सायंकाळी साडेपाचपर्यंत अडीच इंच पावसाची नोंद पणजीत झाली. वास्को परिसरातही मुसळधार पाऊस आला. दाबोळी येथे सकाळपासून सायंकाळी साडेपाचपर्यंत दोन इंचापेक्षा जास्त पाऊस पडला. सांगे, केपे, काणकोण या भागात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे पणजी, मिरामार, ताळगाव इत्यादी भागात पाणी तुंबून राहिले.
त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवणे फार कठीण होऊन बसले. गोव्याच्या अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला असला तरी पुढील पाच दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या 24 तासात सर्वाधिक पावसाची नोंद 5 इंच धारबांदोडा येथे झाली. वाळपईत पावणे चार इंच, सांगेत चार इंच, केपे येथे साडेतीन इंच, सांखळी येथे अडीच इंच, फोंडा सव्वा दोन इंच, मडगाव दीड इंच, जुने गोवे पावणे दोन इंच, म्हापसा सव्वा इंच, पेडणे एक इंच, काणकोण एक इंच, पणजी पाऊण इंच, मडगाव अर्धा इंच एवढी पावसाची नोंद झाली. राज्यात सरासरी गेल्या 24 तासात दोन इंच पावसाची नोंद झाली. उत्तर गोव्यात पावणे दोन इंच तर दक्षिण गोव्यात सव्वा दोन इंच पावसाची नोंद झाली. . यामुळे गोव्यात आतापर्यंत यंदाच्या मोसमत पडलेल्या पावसाची नोंद 34 इंच एवढी झाली आहे. आगामी 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे यादरम्यान जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे पुढील चार दिवस येलो अलर्ट जारी केला आहे.
गोव्यातील सर्व धरणे भरली
दमदारपणे पडणाऱ्या पावसामुळे गोव्याला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे जवळपास भरली आहेत. उत्तर गोव्यातील अंजुणे धरणामध्ये आता 80 मीटर पाणीसाठा जमला आहे. गेल्या 24 तासात पाणी एका मीटरने वाढले आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर पुढील चार दिवसानंतर धरणात 89 मीटर पाणीसाठा होईल. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. तिराळीमधून बुधवारपासून पाण्याचा विसर्ग करणे भाग पाडले आहे. यामुळे डिचोली तालुक्यातील काही गावांना पूर येण्याची शक्यता वाढली आहे.