21 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन
21 ऑगस्टपर्यंत चालणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 21 ऑगस्टपर्यंत होणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी दिली. भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत संसदेचे पावसाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे रिजिजू यांनी ‘एक्स’वर जाहीर केले आहे. या कालावधीत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने 13 आणि 14 ऑगस्ट रोजी दोन्ही सभागृहांचे कामकाज होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी सातत्याने करत होते. याचदरम्यान केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके मांडली जातील. सरकारने 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2025 पर्यंत संसदेचे पावसाळी अधिवेशन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती शेअर केली आहे. संसदेत महत्त्वाची विधेयके आणि अन्य मुद्यांवर चर्चा होईल. या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरबाबत विरोधकांकडून गदारोळ होण्याची शक्यता आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विमा सुधारणा विधेयक मांडले जाऊ शकते. विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा 100 टक्के वाढवण्यासाठी हे विधेयक तयार आहे. विधेयकाचा मसुदा तयार असून तो लवकरच मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी सादर केला जाईल. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा वित्तीय सेवा विभाग संसदेत विधेयक मांडण्याची प्रक्रिया सुरू करेल.