सह्याद्रीतला मान्सूनचा पाऊस
सध्या नैऋत्य मान्सूनचा पाऊस सह्याद्रीच्या पर्वत रांगांनी वेढलेल्या बऱ्याच ठिकाणी सक्रिय झालेला आहे. हिंदी महासागर व अरबी सागरातून नैऋत्य मान्सूनचे वारे जून ते सप्टेंबर महिन्यात पश्चिम घाटातल्या बहुतांश प्रदेशांत पर्जन्यवृष्टी करत असते आणि त्यामुळे खरीप शेतीच्या कामाला चालना मिळते. मान्सूनच्या पावसावरती भारतातल्या पश्चिम घाट आणि परिसरातल्या खरीप शेतीच्या कामाला ऊर्जा लाभते. या पावसावरती शेतीचे भवितव्य अवलंबून असते आणि त्यामुळे या पावसाला अर्थव्यवस्थेचा कणा मानलेले आहे.
दक्षिण भारताच्या केरळ राज्यातून दरवर्षी मान्सूनचा पाऊस सुरू होऊन, त्यानंतर भारताच्या अन्य प्रांतांमध्ये झपाट्याने सरकत जातो. खरीप शेती करणारे शेतकरी या पावसाची चातकासारखी प्रतीक्षा करीत असतात. सह्याद्रीतल्या प्रदेशात जेव्हा नैऋत्य मान्सूनद्वारे पर्जन्यवृष्टी सुरू होते, तेव्हा अल्पावधीतच इथल्या सृष्टीत कायापालट व्हायला सुऊवात होते. जांभ्या दगडांनीयुक्त पठारे ग्रीष्मात अक्षरश: उष्माघातात होरपळून गेलेली असतात. तेथील तृणपाती गायब झालेली असतात परंतु मान्सूनच्या पावसाच्या आगमनाने पठारे, माळराने हिरवाईच्या आगळ्या-वेगळ्या रंगाचे लावण्य मिरवत, जणूकाही तलम धुक्याची दुलई पांघरून घेतात. अशा माळरानावरची मलुल पडलेली खुरटी झुडुपे, वृक्ष-वेली एका नव्या उर्जेने पर्जन्यवृष्टीला झेलतात आणि आपल्यातल्या सौंदर्याचा आविष्कार नानाविविध, रंगीबेरंगी फुलांनी उत्स्फूर्तपणे घडवतात.
मान्सूनच्या पर्जन्यवृष्टीने सह्याद्रीतली पठारे, माळराने, डोंगरांचे उतार, सुंदर हिरवाईने अल्पावधीतच नटतात आणि महाकाय वृक्षांच्या फांद्यांवरती, बुंध्यावरती ‘सीतेची वेणी’, ‘द्रौपदीची वेणी’ या अमरीच्या आगळ्यावेगळ्या पुष्पसंभाराने निसर्गाचे अलौकिक लावण्य अनुभवायला मिळते. श्रावण-भाद्रपदात तर तृणपाती, छोटेखानी झुडुपे विलोभनीय रानफुलांनी अलंकृत होतात.
मान्सूनचा पाऊस सह्याद्रीसाठी किती किमयागार आहे, याची प्रचिती पदोपदी अनुभवायला मिळते. हिंदी महासागर आणि अरबी सागरावरून येणारे नैऋत्य मोसमी वारे अडविण्याचे कार्य खरेतर सह्याद्रीच्या पर्वतरांगा करतात आणि त्यामुळे जून ते सप्टेंबर दरम्यान 3,000 ते 4,000 मिलीमीटर इथल्या प्रदेशांत पर्जन्यवृष्टी होते. त्यामुळे सह्याद्रीतल्या नद्या प्रचंड गोडे पाणी घेऊन वाहतात. गोदावरी, कृष्णा, कावेरीसारख्या नद्या पूर्वेला वाहत जाऊन, बंगालच्या उपसागराशी एकरुप होतात तर पश्चिमेकडे जाणाऱ्या मांडवी, काळी, जुवारी, सावित्री, वसिष्ठी, उल्हास आदी नद्या तीव्र उतारावरून धावत अरबी सागराशी मिळतात. या खाऱ्या व गोड्या पाण्याच्या मिश्रणाने खाडीचा प्रदेश निर्माण झालेला असून, या खाड्यांत मुबलक मासे, खेकडे, खुबे, कालवे यांची पैदासी होऊन, इथल्या लोकांना पौष्टिक अन्नाची रसद उपलब्ध झालेली आहे. त्याचप्रमाणे वैविध्यपूर्ण अशा खारफुटींच्या जंगलांचे सुरक्षा कवच वादळ-वारे, भूकंप, त्सुनामी, महापूर यांच्या प्रकोपांपासून रक्षणाचे कार्य करीत आहे. उष्णकटिबंधीय दमट, शुष्क हवामान, मुबलक मौसमी पर्जन्यवृष्टी आणि सागराने समृद्ध किनारपट्टी यामुळे सह्याद्रीच्या कुशीत वैविध्यपूर्ण जैविक संपदेचा आविष्कार अनुभवायला मिळतो. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू येथील पश्चिम घाट, गोव्याचा प्रदेश वगळता 2012 साली ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झालेला आहे.
पश्चिम घाटातील कातळांनी समृद्ध सडे, बऱ्याचदा निऊपयोगी अशी धारणा झालेली असते परंतु पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व विशेष असून, मान्सूनच्या पर्जन्यवृष्टीमुळे असंख्य खुरटी झुडुपे, तृणपाती पुष्पोत्सव साजरा करतात, ज्याच्यावरती फुलपाखरे, कृमी-कीटक यांच्या प्रजाती गुजराण करतात. त्याचप्रमाणे असे सडे ससे, साळींदर, पिसय, भेकरे, गवे आदी प्राण्यांच्या अस्तित्वाला पुरक ठरतात. मान्सूनच्या काळात इथल्या सह्याद्रीच्या परिसरात वायतुरा, खरचुडी, गंगोत्रा, दीपकाडी, दवबिंदू, तेरडा, बरका, सीतेची आसवे आदी दुर्मीळ आणि प्रदेशनिष्ठ वनस्पतींचे नव्या उर्जेने वैभव अनुभवायला मिळते. मान्सूनचा पाऊस हा सह्याद्रीचा सखाच म्हणावा लागेल. त्यासाठी गोव्यातल्या सह्यादीच्या कुशीत वसलेल्या सत्तरीच्या गावांतल्या कष्टकरी समाजाने इथल्या भूमीला ‘अस्तुरी’ म्हणजे स्त्राr तर पावसाला तिच्या सृजनत्वाला आणि सर्जनशीलतेला जागविणारा तिचा सखा मानलेला आहे, याची प्रचिती शिगमोत्सवातल्या लोकगीतांतून येते. सह्याद्रीच्या पर्वतरांगांतच नव्हे तर त्याच्या परिसरात मान्सूनच्या पावसाच्या आगमनाने विलक्षण असा कायापालट झालेला पाहायला मिळतो. डोंगर माथ्यावरती उगम पावणारे असंख्य नदी-नाले, मान्सूनच्या पावसाने तुडुंब भरून खाली वाहत येताना गोड्या पाण्याचा प्रचंड साठा घेऊन येतात. हेच पाणी नद्यांशी संलग्न असणाऱ्या खाड्यांतील क्षारतेच्या प्रमाणाला नियंत्रित करण्याबरोबर तेथील मत्स्य संपदेला जोजविण्याचे आणि जगविण्याचे कार्य करत असतात.
6 जूनला मान्सूनच्या पावसाने गोव्यात आणि महाराष्ट्रातल्या दक्षिण कोकणात आपली हजेरी लावली असून, आता कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या प्रदेशातही त्याची उपस्थिती प्रकर्षाने जाणवत आहे. पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या लोकमानसाच्या जीवनात, त्याच्या येण्याने उत्साह संचारलेला आहे. मान्सूनचा पाऊस ही सह्याद्रीतल्या कष्टकऱ्यांसाठी महत्त्वाची जीवनरेषा ठरलेला आहे. खारभूमी क्षेत्राबरोबर अन्य ठिकाणी भातशेती करणारे कष्टकरी, पावसात उपलब्ध पाण्याचा उपयोग कुशलपणे करून, अन्नाच्या महत्त्वाच्या स्रोताबरोबर कंदमुळांचीही पैदासी प्रामुख्याने करत असतात.
इथल्या तळ्या, तलाव तसेच नदी-नाल्यांना पाण्याचा साठा खरेतर मान्सूनच्या पावसाद्वारे उपलब्ध होत असतो आणि त्यामुळे उन्हाळ्यात विहिरी, तलावांतल्या गाळांचा उपसा करून, ग्रामीण भागातील लोक पूर्वीच्या काळी पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त संचय व्हावा, यासाठी प्रयत्न करायची. आज धरणांच्या जलाशयातले पाणी पाट, कालवे यांच्या माध्यमांतून गावातल्या शेताभातांत, कुळागरांत खेळते राहून देखील, लोकमानस समाधानी नाही. त्यामुळे मान्सूनच्या पावसाच्या आगमनानेच, त्यांच्या जगण्याला उत्साहीत केलेले आहे.
जागतिक हवामान संघटनेने, यंदा मान्सूनवर ‘एल निनो’चे सावट असल्याने पर्जन्यवृष्टीवर प्रादुर्भाव पाडणार असल्याने, दुष्काळाची शक्यता वर्तविली आहे आणि त्यामुळे सिंचन तसेच पेयजलाचे दुर्भिक्ष्य निर्माण होणार असल्याची चिन्हे आहेत. प्रशांत महासागरातून येणाऱ्या वाफेने भरलेल्या ढगांना दक्षिणेकडून हवा तसा दाब मिळत नसल्याने, भारतासारख्या देशात यंदा कमी पर्जन्यमानाची शक्यता वर्तवलेली आहे. त्यासाठी मान्सूनच्या पावसात जे पाणी नदी-नाले, झरे, तळ्या, तलावांद्वारे उपलब्ध होणार आहे, त्याचा नियोजनबद्ध संचय करून वापर करण्याची नितांत गरज आहे.
-राजेंद्र पां. केरकर