दोन दिवसांत मान्सून देश व्यापण्याची शक्यता
प्रतिनिधी / .पुणे
नैऋत्य मोसमी वारे येत्या दोन दिवसांत देश व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोकण आणि आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या काही भागात अद्यापही मान्सून पोहचलेला नाही. बाकी देशाचा संपूर्ण भाग मोसमी वाऱ्यांनी व्यापला आहे. येत्या दोन दिवसांत पोषक स्थितीमुळे मान्सून देश व्यापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कच्छ आणि परिसर तसेच पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात देखील पाऊस होणार आहे. बांगलादेश लगतचे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर, पश्चिम उत्तरेकडे सरकणार असून, यामुळे पश्चिम बंगाल, ओरिसा, झारखंड, बिहारमध्ये पाऊस होणार आहे.कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात 2 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.राज्याच्या इतर भागात वादळी पावसाचा यलो अलर्ट आहे.
3 जुलै ते 10 जुलै दरम्यान पाऊस
राज्यात 3 जुलै ते 10 जुलै दरम्यानच्या आठवड्यात कोकण आणि विदर्भात चांगला पाऊस राहणार आहे, त्या तुलनेत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस कमी राहील,असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 3 जुलै पर्यंत कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे.
दिल्लीसह उत्तर भारतात दमदार पाऊस
उत्तरेकडील राज्यामध्ये दमदार पाऊस सुरू असून शुक्रवारी रात्री उशिरा उत्तराखंडच्या सोनप्रयागमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. या आपत्तीमुळे केदारनाथ महामार्ग वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आला आहे. रस्त्यावरील मातीचा ढिगारा काढण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी प्रवाशांना काही अंतरावर सुरक्षित ठिकाणी थांबवले आहे. याचदरम्यान, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर, आसाम (दक्षिण) येथे रेल्वेमार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे शनिवारी सलग पाचव्या दिवशी रेल्वेसेवा विस्कळीत झाली.
भारतीय हवामान विभागाने देशातील 31 राज्यांमध्ये पावसाचा इशारा जारी केला आहे. उत्तर प्रदेश-बिहारसह देशातील 27 राज्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट आहे. त्याचवेळी, उत्तराखंड, गुजरात, मध्य महाराष्ट्र, केरळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजस्थानच्या 29 जिह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट आहे. शुक्रवारी जैसलमेर, जयपूर, सिकर, अलवरसह 25 हून अधिक जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. त्याचवेळी, बुंदीमध्ये एका तरुणाचा आणि एका महिलेचा, सिरोहीमध्ये एका मुलाचा आणि डुंगरपूरमध्ये एका तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. हवामान विभागाने शनिवारी दिल्ली आणि लगतच्या भागात यलो अलर्ट जारी केला होता.
आग्नेय आणि नैर्त्रुत्य दिल्लीत पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून तिथे हलका ते मध्यम पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या उर्वरित भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारी उत्तर प्रदेशातील अनेक जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. यामध्ये वाराणसी, आग्रा, मथुरा यासह अनेक जिह्यांचा समावेश आहे. येथे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.