मान्सूनची माघार, मात्र गोव्यात मुसळधार पावसाचा जोर कायम
पणजी : मान्सूनने आता संपूर्ण देशातून माघार घेतली असून ईशान्य मान्सून आता दक्षिण भारतात सक्रिय झाला असून परिणामी गोव्यात मंगळवारी जोरदार पाऊस पडला. विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळी वारे देखील सुरू झाले. आज सर्वत्र विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे. गोव्यात मंगळवारी सायंकाळी सर्वत्र मुसळधार पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार नैऋत्य मान्सूनने संपूर्ण देशभरातून माघार घेतली आणि 15 ऑक्टोबरपासून ईशान्य मान्सूनने सक्रिय होऊन दक्षिण भारतापासून पूर्वोत्तर राज्यांपर्यंत जोरदार पावसाची हजेरी लावली. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचे वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे,
परिणामी तामिळनाडू, आंध्र प्रदेश आदी भागात सध्या जोरदार पाऊस चालू आहे. गोव्यामध्ये देखील सध्या पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान मान्सूनात्तर पावसाने देखील एक नवा विक्रम स्थापित केला असून सध्या पडणारा पाऊस हा वार्षिक सरासरीपेक्षा पन्नास टक्के ज्यादा पडत आहे. गेल्या 24 तासात काणकोन, सांगे येथे प्रत्येकी एकेक इंच तर वाळपई, साखळी या ठिकाणी पाव इंच पावसाची नोंद झाली. पेडणे, मडगाव, जुने गोवे येथेही तुरळक प्रमाणात पावसाची नोंद झाली. मान्सूनोत्तर पाऊस आता साडेपाच इंच झाला आहे. येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा सायंकाळी हवामान खात्याने दिला. वादळी वाऱ्याचा वेग ताशी 55 किलोमीटर असेल. मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.