आला पावसाळा, साथींपासून सांभाळा...
महापालिकेच्या डेंग्यू सर्व्हेक्षणात रोज 50 घरात डासांच्या अळ्या, डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका, हिवतापाचा विस्फोट होण्याचा धोका
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नागरिकांकडून खबरदारीची गरज, जिल्ह्यात शेकडो सक्रीय रूग्ण : साथींपासून संरक्षण हाच उपाय
कोल्हापूर► इम्रान गवंडी
गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर महापालिकेने केलेल्या डेंग्dयू सर्व्हेक्षणात रोज 50 ते 60 घरात डासांच्या अळ्या सापडत आहेत. रोजच्या सर्व्हेक्षणात आढळणाऱ्या डासांच्या अळ्यांचे वाढते प्रमाण म्हणजे डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका, हिवताप रोगांचा विस्फोट होण्याचा धोका आहे. साथीपासून संरक्षण हाच उपाय असून पावसाळ्यात डासांची उत्पत्ती रोखा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शहरात डासांची उत्पत्ती रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. प्रशासनाकडून उपाययोजना होत असल्या, तरी नागरिकांनी डासांची उत्पत्ती व रोगांचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. शहरासह जिल्ह्यात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच डेंग्यू, चिकुनगुनिया, हिवतापासह अन्य जलजन्य साथींनी डोके वर काढले आहे. त्यामुळे लहान मुले व ज्येष्ठांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ञांनी केले आहे. जिह्यात सद्यस्थितीत डेंग्यू, चिकनगुनियाचे शेकडो रुग्ण सक्रीय असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
पावसाळ्यात चिकुनगुनिया, डेंग्यूसारखे साथरोन डोके वर काढतात. याला डासांची होणारी उत्पत्ती जबाबदार असते. जिह्यात डेंग्यू व चिकुनगुनियाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. घरात जास्त दिवस पाणी साठवून ठेवल्यास डेंग्यू, चिकुनगुनिया डासांची निर्मिती होते. कुलर, रेफ्रीजरेटरमध्ये साचलेले पाणी, अडगळीत पडलेले टायर, कुंड्यामध्ये बरेच दिवस साचलेल्या पाण्यात डासांच्या निर्मितीचे प्रमुख कारण बनत आहे.
पावसाळ्यात डासांच्या निर्मितीसाठी पोषक वातावरण असते. परिणामी मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होते. राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप प्रतिरोध महिना म्हणून जूनमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. आशा सेविकांकडून घरोघरी सर्व्हेक्षण केले जात आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजनाबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे.
आजार टाळण्यासाठी उपाययोजना
साचलेल्या पाण्यात जळके ऑईल टाका.
एसी, फ्रीजमधील पाणी वारंवार बदला.
घराच्या खिडक्यांना डासविरोधी जाळ्या बसवा.
पाण्याची डबकी वाहती करा, अन्यथा ती भरा.
वापरातील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावा.
पाण्याची भांडी स्वच्छ करून एक कोरडा दिवस पाळा.
झोपतांना मच्छरदाणीचा वापर करा.
चिकुनगुनियाची लक्षणे
चिकनगुनियाचे संक्रमण झालेल्याला मळमळ व डोकेदुखीचा त्रास होतो. अंगदुखी, डोळ्यांमध्ये जळजळ, भूक मंदावणे, घसा कोरडा पडणे, अंगावर पुरळ येणे अशी लक्षणे दिसून येतात.
डेंग्यूची लक्षणे
संक्रमण झालेल्याला थंडी व ताप येतो. डोकेदुखी, अंगदुखी, हाडे व सांध्यांमध्ये वेदना होतात. मळमळणे, अंगावर सूज, चट्टे येणे अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.
डासांचे निर्मिती चक्र तोडा
साचलेल्या पाण्यात अंडी घातल्यानंतर साधारणत: सात दिवसांत डासांची निमिर्ती होते. एकाच डासामुळे झिका, डेंग्यू, चिकुनगुनिया सारखे आजार पसरू शकतात. डासांच्या निमिर्तीची साखळी तोडल्यास डासांची उत्पत्ती कमी होऊन रोगांचा फैलाव रोखता येऊ शकतो. यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
डॉ. योगेश साळे, सहायक संचालक, हिवताप विभाग