मान्सून केरळमध्ये दाखल
यंदा सहा दिवस अगोदरच एन्ट्री : गोव्यात नारंगी अलर्ट जारी
पणजी : दरवर्षीपेक्षा यंदा सहा दिवस अगोदरच मान्सून केरळमध्ये पोहोचला असून त्याचबरोबर तो कारवारपर्यंत पोहोचलेला आहे. कदाचित आज मान्सून गोव्यात प्रवेश करू शकतो. दरम्यान आज, उद्या, परवासाठी हवामान खात्याने नारंगी अलर्ट जारी केला आहे आणि 30 मेपर्यंत येलो अलर्टचा इशारा दिला आहे. आजही गोव्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली. गोव्यात मान्सूनसाठी पूरक असे वातावरण तयार झाले आहे. दरवर्षी साधारणत: 30 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचतो परंतु यंदा तो 24 मे रोजी पोहोचला आहे आणि त्याची व्याप्ती कारवारपर्यंत पोहचली आहे. गोव्यात तो आज व उद्या पोहचू शकतो. साधारणत: गोव्यात पाच जून रोजी मान्सून पोहोचला जातो यंदा तो फार लवकर पोहोचणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. आगामी 48 तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शनिवारी गोव्यात रेड अलर्ट जाहीर केला होता तथापि पावसाचे प्रमाण फार अत्यल्प राहिले. गेल्या 24 तासांमध्ये देखील पावसाचा जोर थोडा ओसरला. गोव्याकडे आलेले ढग आणि कमी दाबाचा पट्टा कोकणवरून पुढे सरकला असून तो मुंबईच्या दिशेने व तिथून थेट गुजरातकडे जात असल्याचे सॅटलाईट चित्रावरून दिसून येते
तब्बल 19 इंच पाऊस !
यंदा एक मार्चपासून पडलेला पाऊस हा तब्बल 19 इंच झालेला आहे. अर्थात मार्चपासून मे 20 पर्यंत अर्धा पाऊण इंचाची नोंद झालेली होती आणि उर्वरित जो पाऊस कोसळला तो गेल्या चार-पाच दिवसात पडलेला आहे. यंदा मान्सूनपूर्व पावसाने फार मोठा रेकॉर्ड प्रस्थापित केला असून आतापर्यंतचा तो उच्चांक ठरला आहे. गेल्या 24 तासांमध्ये पावसाचे प्रमाण थोडे कमी झाले आणि सरांसाठी अडीच इंच पावसाची नोंद झाली. त्यामुळे यंदाच्या मोसमातील एकूण पाऊस हा 19 इंच झालेला आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या तुलनेत 98 टक्के जास्त पडलेला आहे. मान्सूनपूर्व पाऊस यादरम्यानचा कालावधीत केवळ दीड इंचाची नोंद होत असते.
सर्वाधिक पाऊस सांखळीत
दरम्यान, गेल्या 24 तासांत सर्वाधिक पाऊस साडेतीन इंच सांखळीत पडला. फोंडा व जुने गोवे येथे प्रत्येकी तीन इंच. मडगावमध्ये अडीच इंच, पणजीतही अडीच इंच, धारबांदोडा येथे सव्वा दोन इंच, केपे येथे दोन इंच, मुरगाव येथे दोन इंच, पेडणे, सांगे व म्हापसा येथे प्रत्येकी दीड इंच तर दाबोळी व काणकोण येथे प्रत्येकी सव्वा इंच पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असून समुद्र खवळलेला राहील. वादळी वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 65 किमी पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे.