मान्सून चार दिवस आधीच देवभूमी केरळात
हवामान विभागाचा अंदाज, - अंदमानात 13 मेपर्यंत सक्रिय : - यंदा दमदार पावसाचे संकेत
प्रतिनिधी / पुणे
नैऋत्य मोसमी वारे अंदमान व निकोबार बेटावर 13 रोजी, तर देवभूमी केरळात नियोजित वेळेच्या 4 दिवस आधीच म्हणजेच 27 मे रोजी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे यंदा मोसमी पावसाचा प्रवास लवकरच सुरू होण्याची चिन्हे असून, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
साधारणपणे मान्सून अंदमानात 18 ते 20 मे दरम्यान, केरळात 1 जूनच्या आसपास, तळकोकणात 7 जूनला, महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत, तर संपूर्ण देशभरात 15 जुलैपर्यंत सक्रिय होत असतो. मात्र, यंदाच्या मान्सूनने लवकरच वर्दी दिल्याचे दिसत आहे. पुढील आठवड्यापर्यंत अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सूनचा पाऊस सुरू होऊ शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 13 मेपर्यंत मान्सून अंदमान आणि निकोबारच्या काही भागात दाखल होण्याची शक्मयता आहे. त्यानंतरच्या तीन ते चार दिवसात तो अंदमान, निकोबार बेटासह अंदमान समुद्राचा परिसर व्यापण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाकरिता स्थिती अनुकूल असल्याने त्याचा पुढचा प्रवास झपाट्याने होण्याची चिन्हे आहेत. 2009 मध्ये मान्सून लवकरच म्हणजे 23 मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता. यंदा 27 मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर तो लवकरच सक्रिय झाला, तर मागच्या 15 वर्षांतील मान्सूनची हा गतिमान प्रवास असेल. त्यानंतरही मान्सूनची वाटचाल सुरूच राहणार असून, महाराष्ट्रातही तो नियोजित वेळेआधी येण्याची लक्षणे आहेत. तर साधारण 8 जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापेल, असा अंदाज आहे.
मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाच्या काही भागांत पाऊस होत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळत आहे. आता मोसमी पाऊसही लवकरच दाखल होत असल्याने शेतकऱ्यांसह सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कृषीप्रधान देश असलेल्या भारतात मान्सूनला महत्त्व आहे. शेती, सिंचनासह देशातील जलव्यवस्थापन प्रामुख्याने मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. मागच्या काही वर्षांत देशातील पावसाचे प्रमाण चांगले राहिले आहे. यंदा हवामान विभागाने जून ते सप्टेंबर या हंगामात 105 टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर या वर्षी एल निनोचा धोका नसल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष हे पावसाचे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातही चांगल्या पावसाची शक्यता
मागील पाच वर्षांत तीन वेळा मान्सून उशिरा आणि दोन वेळा वेळेआधी केरळमध्ये दाखल झाला आहे. यंदाही सरासरी वेळेच्या जवळपास एक आठवडा आधी मान्सून देशात दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. हवामान विभागाने यंदा 105 टक्के पावसाचा अंदाज दिला आहे. यामध्ये पाच टक्के कमी किंवा अधिक पाऊस पडण्याची शक्मयता आहे. भारतभर चांगल्या पावसाचे संकेत आहेत. विशेषत: मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्मयता वर्तविण्यात आली आहे. या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि त्यांची पिके चांगली होण्याची आशा आहे.
सहा परिमाणांवरून मान्सूनच आगमन निश्चिती
मान्सून केरळमध्ये आगमनाची वेळ सहा परिमाणांवरून ठरवली जाते. त्यात वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीप्रकल्पावर पूर्व मोसमी पावसाचे वाढलेले प्रमाण, प्रशांत महासागरातील वायव्य भागातील समुद्रसपाटीवरील हवेचे दाब, दक्षिण चीन समुद्रातून बाहेर पडणारे किरणोत्सर्ग, ईशान्य हिंद महासागरातील हवेच्या खालच्या थरातील वाऱ्याचे प्रवाह आणि इंडोनेशियातील हवेच्या वरच्या थरातील वाऱ्याचे प्रवाह या सर्व परिमाणांचा विचार केला जातो. त्यानुसारच सध्याचा अंदाज सांगण्यात आला आहे.