मान्सून सक्रिय, फोंड्यात विक्रमी पाऊस
पणजी : गोव्यात मान्सून सक्रिय झाला असून गेल्या 24 तासात वाळपई वगळता सर्वत्र पावसाने अक्षरश: झोडपून काढले. फोंडामध्ये 8.50 एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली असून राज्यात सरासरी 4 इंच पाऊस पडला आहे. आजपासून तीन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दि. 17 ते 19 जून रोजी यलो अलर्ट जारी केला असून यादरम्यानही राज्यात जोरदार पाऊस पडणार, असा अंदाज आहे. गेले आठ दिवस दडी मारलेल्या मान्सूनने आपली आक्रमकता दाखवण्यास प्रारंभ केला आहे.
गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा गोव्यात पावसाने झोडपून काढले. शुक्रवारी रात्री पणजीत मुसळधार पाऊस उशिरापर्यंत चालू होता. फोंड्यात मात्र पावसाने कहर केला आहे. गेल्या 24 तासात फोंड्यात साडेआठ इंच एवढा विक्रमी पाऊस झाला. यंदाच्या मौसमातील हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. फोंडा तालुक्यामध्ये रात्रभर संततधार पाऊस पडत राहिला. त्या परिसरातील नदी, नाले भरून वाहत आहेत. मोसम सुरू होण्याअगोदरच गोव्यात सुमारे 30 इंच पावसाची विक्रमी नोंद झालेली आहे. यंदा अतिरिक्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने अगोदरच व्यक्त केलेला आहे.
गेल्या 24 तासातील विक्रमी पाऊस
फोंडा 8.50, धारबंदोडा सहा पूर्णांक पाच इंच. सांगे सहा पूर्णांक पाच इंच, काणकोण 5.50 इंच, केपे चार इंच, म्हापसा चार इंच, पेडणे तीन पूर्णांक पाच इंच, पणजी तीन पूर्णांक पाच इंच. जुने गोवे तीन पूर्णांक पाच इंच, दाबोळी तीन पूर्णांक पाच इंच, मडगाव तीन इंच, मुरगाव दोन इंच, साखळी एक पूर्णांक पाच इंच एवढी पावसाची नोंद झालेली आहे. गेल्या 24 तासातील पाऊस लक्षात घेता उत्तर गोव्यात सव्वा तीन इंच तर दक्षिण गोव्यात पाच इंच सरासरी पाऊस झाला. यामुळे गोव्यातील सरासरी पाऊस गेला 24 तासांमध्ये चार इंच पडला तर यंदाच्या मौसमात आतापर्यंत 11 इंच पावसाची नोंद झालेली आहे.
आगामी 72 तास हे अत्यंत महत्त्वाचे असून यादरम्यान गोव्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील चार दिवस समुद्र खवळलेला राहील आणि त्याचबरोबर लाटांची उंची देखील वाढणार आहे. ताशी 60 किलोमीटर वेगाने वारा वाहण्याची शक्यता असून पारंपरिक मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उत्तर पूर्व राजस्थानपासून मराठवाडा, मध्य प्रदेश आणि विदर्भ या दरम्यान हवेत वादळी वातावरण तयार झाले असून पश्चिम अरबी समुद्रात तसेच ओडिशाच्या दक्षिण किनारी भागात देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातून गोव्यातही वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.