For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Maharashtra Weather | महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय; मुंबई, पुण्यासह कोकणात ‘ऑरेंज अलर्ट’

09:55 AM Jul 21, 2026 IST | NEETA POTDAR
maharashtra weather   महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय  मुंबई  पुण्यासह कोकणात ‘ऑरेंज अलर्ट’
Advertisement

मुंबई :जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार हजेरी लावल्यानंतर काही दिवस विश्रांती घेतलेल्या मान्सूनने महाराष्ट्रात पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली आणि हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाने २१ जुलै रोजी मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यांतील घाट परिसरासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. आगामी काही दिवसांत राज्यातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानपासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. तसेच मध्य भारत आणि पूर्व किनारपट्टीवर निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे मोसमी वाऱ्यांना मोठा वेग मिळाला आहे. सोमवारी मुंबई आणि ठाण्यात सुरुवातीला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला होता, परंतु दुपारनंतर पावसाची तीव्रता वाढल्याने हवामान विभागाने तो तातडीने ‘ऑरेंज अलर्ट’मध्ये बदलला. रायगड जिल्ह्यात ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासोबत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांतही मुसळधार सरींचा अंदाज आहे.

पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता डोंगराळ आणि घाट परिसरात पावसाचा सर्वाधिक प्रभाव जाणवणार आहे. पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने तिथे ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. याउलट सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर तुलनेने कमी राहून केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

Advertisement

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाची हालचाल वाढणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने या भागात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नाशिकचा घाट परिसर, जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्येही मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भात मात्र पावसाची स्थिती अद्याप चिंतेचीच असून अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह बहुतेक जिल्ह्यांमध्ये केवळ हलक्या सरींचा अंदाज आहे.

दरम्यान, चालू आठवड्यात पावसाचा जोर वाढणार असला तरी जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीसारखी स्थिती निर्माण होणार नाही, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे महिन्याच्या अखेरपर्यंत पावसाची एकूण तूट पूर्णपणे भरून निघण्याची शक्यता कमीच मानली जात आहे

Advertisement
Tags :

.