For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ताळगांव पंचायतीवर मोन्सेरातांचे वर्चस्व

12:13 PM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
ताळगांव पंचायतीवर मोन्सेरातांचे वर्चस्व
Advertisement

सर्व अकराही उमेदवार विजयी : चार जणांची निवड बिनविरोध,विरोधकांचा झाला दारुण पराभव

Advertisement

पणजी : राजधानी पणजीला टेकून असलेल्या ताळगाव ग्रामपंचायतीवर महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या गटाचा झेंडा फडकला असून सर्व 11 प्रभागांत त्यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणूक निकालातून मोन्सेरात यांचे ताळगावातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पंचायतीच्या एकूण 11 प्रभागांपैकी 4 प्रभागांत मोन्सेरात गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्याच वेळी मोन्सेरात यांचा गट ताळगांव पंचायतीवर वर्चस्व गाजविणार याचे संकेत मिळाले होते. मतमोजणीनंतर ते खरे ठरले असून तेथील मतदारांनी पुन्हा एकदा मोन्सेरात गटाला भरघोस मतांनी निवडून दिले  आहे. चार प्रभागांत बिनविरोध निवड झाल्यामुळे त्या ठिकाणी निवडणूक झाली नाही. इतर 7 प्रभागांमध्ये निवडणूक घेण्यात आली होती. एकूण 68.79 टक्के मतदान झाले होते.

विरोधकांचा दारूण पराभव

Advertisement

काल सोमवारी सकाळी बालभवन-कांपाल येथे मतमोजणी होऊन दुपारपर्यंत निकाल जाहीर करण्यात आले. एकूण 7 प्रभागांत सरळ लढत होऊन मोन्सेरात गटाच्या विरोधी उमेदवारांचा धुव्वा उडाला. मोन्सेरात गटाच्या विरोधात इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र येऊन उमेदवार उभे केले होते. त्यांची डाळ मोन्सेरात गटासमोर शिजली नाही. त्यांना दारूण पराभव सहन करावा लागला. निवडणूक चुरशीची होईल असा अंदाज होता परंतु तो खोटा ठरला आणि निवडणूक एकतर्फी झाल्याचे दिसून आले.

निवडणुकीतील उमेदवार व त्यांची मते

 • प्रभाग 1 : सिद्धी राजेंद्र केरकर (बिनविरोध)
 • प्रभाग 2 : आग्नेलो सिरीलो डिकुन्हा 1403 (विजयी). डोमिंगो जोस डिकुन्हा - 124.
 • प्रभाग 3 : हेलेना आंतोनियो परेरा - 751 (विजयी), इमी रॉड्रीग्स - 384
 • प्रभाग 4 : रातिका रविंद्र गावस - 692 (विजयी), माधवी काणकोणकर - 204
 • प्रभाग 5 : उशांत नामदेव काणकोणकर - 493  (विजयी), दिशा मुरगावकर - 302
 • प्रभाग 6 : इस्तेला डिसोझा (बिनविरोध)
 • प्रभाग 7 : जानू रोझारियो - 1101 (विजयी), विजू दिवकर - 387,
 • प्रभाग 8 : मारिया फर्नांडिस 783 (विजयी), इयान डायस - 367.
 • प्रभाग 9 : संजना दिवकर - 853 (विजयी), वनिता वेळुस्कर 163.
 • प्रभाग 10 : सागर बांदेकर (बिनविरोध)
 • प्रभाग 11 : सिडनी बार्रेटो (बिनविरोध)

पणजीची स्वप्ने कोणी पाहू नये : मोन्सेरात

ताळगांव सरपंचपदासाठी नवीन चेहरा देणार असून विधानसभेकरीता पणजी मतदारसंघ सोडणार नाही. तेथे निवडून येण्याची कोणाची स्वप्ने असल्यास ती कधीच पूर्ण होणार नाहीत. ती स्वप्नेच राहातील, असे निवेदन महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी केले. ताळगांव पंचायत निवडणूक निकालानंतर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोणत्याही निवडणुकीत मतदार ‘सुप्रीम’ आणि ‘किंग’ असतात. उमेदवार कधीच तसा नसतो. त्यासाठी मतदार पाठीशी असावे लागतात. मतदारांशी आपण कायम संपर्कात राहतो. मतदारांनी जो विश्वास आपल्यावर दाखवला आहे तो सार्थ करणार असल्याचे मोन्सेरात यांनी नमूद केले. त्यांनी मतदारांचे आभार मानले असून ताळगांवसाठी आता नवीन सरपंच देणार असल्याचे स्पष्ट केले. ताळगांवसाठी अनेक विकासाची आश्वासने देण्यात आली असून ती पूर्ण होतील यासाठी प्रयत्न करणार आहे. ताळगांवात चांगले मार्केट उभारणार असून त्यासाठी जागा निश्चित केलेली आहे. इतर काही कामे बाकी असून ती पूर्ण व्हावीत म्हणून पंचायत काम करेल.

Advertisement
Tags :

.