शहरात माकडांचा धुमाकूळ
खिडक्या, काचेच्या वस्तू अन् कौलांचे नुकसान
बेळगाव : शहरात मागील काही दिवसांपासून माकडांचा धुमाकूळ वाढला आहे. विशेषत: गोंधळी गल्ली, गणाचारी गल्ली, रिसालदार गल्ली, गवळी गल्ली, कंग्राळ गल्ली आदी ठिकाणी माकडांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे रहिवाशांच्या घरांच्या खिडक्या, कौले आणि इतर साहित्याचे नुकसान होऊ लागले आहे. त्याबरोबर बाजारपेठेतील किरकोळ साहित्याचे नुकसान होत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे. वनखात्याने तातडीने माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. शहरात माकडांच्या कळपांचा हैदोस सुरू आहे. त्यामुळे महिला व लहान बालकांमध्येही भीती निर्माण झाली आहे. स्लॅबवर असलेल्या सोलारच्या ट्यूबलाही धोका निर्माण होऊ लागला आहे. शिवाय काचेच्या वस्तूंचे नुकसान होत असल्याच्या तक्रारीही महिलांनी केल्या आहेत. संपूर्ण कळपच एका घरावरून दुसऱ्या घरावर उड्या घालत असल्याने कौलांचेही नुकसान होत आहे. वनखाते ही बाब गांभीर्याने घेणार का? असा प्रश्नही नागरिकांनी केला आहे.