For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओलमणी येथे वानरांचा धुमाकूळ

10:43 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
ओलमणी येथे वानरांचा धुमाकूळ
Advertisement

वार्ताहर /जांबोटी

Advertisement

गेल्या दोन-तीन वर्षापासून ओलमणी गावात वानरांच्या कळपाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे.त्यांच्याकडून घरांच्या छप्परावरील कौले तसेच फळझाडे, परसातील भाजीपाला आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे नागरिक वैतागून गेले आहेत. वनखात्याने या वानरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. ओलमणी गावामध्ये गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वानरांचा धुमाकूळ सुरू असल्यामुळे, नागरिक मेटाकुटीला आले आहेत. सदर वानरांचा कळप दिवसभर गावात अक्षरश: धुमाकूळ घालत असून, त्यांच्या मर्कटलीलांमुळे नागरिक वैतागून गेले आहेत. सदर वानर घराच्या छप्परावर चढून या घरावरून त्या घरांवर बिनधास्तपणे उड्या मारत असल्यामुळे, तसेच गावातील बहुसंख्य घरे कौलारू असल्याने त्यांच्या उड्यांमुळे छप्परावरील कौलांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत असल्याने गंभीर समस्या उद्भवली आहे.

प्रारंभीच्या काळात केवळ दोन-तीन वानर वास्तव्यास होते. मात्र दिवसेंदिवस त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सध्या गावात 15 संख्या असलेला वानरांचा कळप वास्तव्यास असून त्यांच्या उपद्रवामुळे नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. सदर वानरे परसात असणारी आंबा, फणस, नारळ, केळी, चिक्कू इत्यादी फळांचे तसेच फळ झाडांचे देखील मोठ्याप्रमाणात नुकसान करीत आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी परसात लावलेल्या फुले, भाजीपाला आदींचे देखील त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणात नुकसान होत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, त्यांच्या तावडीतून घरे व फळ झाडांचे कसे संरक्षण करावे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तसेच वानरांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी देखील झाले आहेत. या वानरांच्या मर्कटलीलांमुळे ओलमणी गावातील नागरिक अक्षरश: वैतागून गेले आहेत. वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी वनखात्याकडे अनेकवेळा केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. वनखात्याने त्यांना सापळा लावून पकडून वानरांना दूर जंगलात नेऊन सोडावे, अशी मागणी ओलमणी गावातील नागरिकांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.