यमनापूर येथे माकडांचा उच्छाद
माकडांच्या मुक्त संचारामुळे नागरिक त्रस्त : बंदोबस्ताची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
शहर परिसर आणि तालुक्यामध्ये माकडांनी उच्छाद मांडला असून त्यांना कसे आवरावे? याची चिंता नागरिकांना लागून राहिली आहे. सर्वत्र माकडे मुक्त संचार करत असून, घरांच्या कौलांवर ताडताड नाचून कौले फोडत आहेत. फळांचा फडशा पाडत आहेत. त्यामुळे ही समस्या कशी सोडवायची? हा प्रश्न पडला आहे.
यमनापूर येथे माकडांची टोळीच गल्लोगल्ली फिरत आहे. कौलांवर बसून माकडांचा धिंगाणा सुरू आहे. त्यांना आवरण्यासाठी नागरिक फटाके फोडणे, मोठमोठ्याने आवाज करणे असे प्रकार करत आहेत. परंतु, त्यामुळे माकडे अधिकच बिथरत असून त्यांचा उच्छाद वाढला आहे. आता काही धाडसी नागरिकांनी हातात काठ्या घेऊन आपला टेरेस गाठला आहे. माकडे दिसताक्षणीच त्यांच्यावर काठी उगारण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, तो फारसा यशस्वी होताना दिसत नाही. वनखात्याने या समस्येची दखल घेऊन माकडांचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.