संतिबस्तवाड येथे माकडाचा बालकावर हल्ला
बालक गंभीर जखमी : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वार्ताहर / किणये
संतिबस्तवाड गावात माकडाने एका बालकावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सदर बालक गंभीर जखमी झाला आहे. अर्पित अजित बिर्जे (वय 8) असे त्या बालकाचे नाव असून माकडाने शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास बालकावर हल्ला केला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
माकडाने केलेल्या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सरकारी इस्पितळात उपचार सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून गावात आठ ते दहा माकडांचा कळप ठाण मांडून आहे. त्यामुळे आता नागरिक भयभीत झाले आहेत.
अर्पित अजित बिर्जे शनिवारी दुपारी बारा वाजता शाळा झाल्यानंतर घरी आला. तो घरातून खेळण्यासाठी म्हणून संतिबस्तवाड गावातील सातेरी गल्ली येथे गेला होता. त्याच्यासोबत एक मित्र होता. अर्पितच्या हातात एक केळे होते. कदाचित सदर केळे खाण्याच्या आशेपोटीच माकडाने अर्पितवर हल्ला केला.
या माकडाने अर्पितच्या पायाला तीन ठिकाणी चावा घेतला आहे. यावेळी अर्पित आरडाओरडा करत होता. माकडाच्या हल्ल्यामुळे अर्पितच्या पायातून रक्तही मोठ्या प्रमाणात गेले. त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्रावरही सदर माकडाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून गेला.
गावातील नागरिक घटनास्थळी आले व त्यांनी सदर माकडाला हुसकावून लावले.
अर्पितचे आई-वडील शेतावर गेले होते. त्यांना लागलीच बोलावण्यात आले. अर्पितला सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून गावात माकडांचा कळप ठाण मांडून आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्राम पंचायतीने या माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.