‘ड्रोन’द्वारे न्यूझीलंडच्या सरावावर पाळत
फिफा’कडून कॅनडाच्या महिला फुटबॉल संघावर कारवाई, तीन प्रशिक्षकांवर एका वर्षाची बंदी
वृत्तसंस्था/ पॅरिस
फिफाने पॅरिस ऑलिम्पिकमधील महिला विभागातील फुटबॉल स्पर्धेच्या अनुषंगाने ड्रोन हेरगिरी प्रकरणात सहभाग असल्याबद्दल कॅनडाचे सहा गुण कापले आहेत आणि तीन प्रशिक्षकांवर प्रत्येकी एका वर्षासाठी बंदी घातली आहे. उन्हाळी खेळांना वादाच्या भोवऱ्यात टाकणाऱ्या या प्रकरणात कॅनेडियन सॉकर फेडरेशनला ठोठावण्यात आलेल्या 2 लाख स्वीस फ्रँकच्या दंडाचा समावेश आहे.
कॅनडाच्या दोन साहाय्यक प्रशिक्षकांना गेल्या बुधवारी त्यांच्या सलामीच्या सामन्यापूर्वी प्रतिस्पर्धी न्यूझीलंडच्या सरावावर हेरगिरी करण्यासाठी ड्रोनचा वापर करताना पकडले गेले होते. मुख्य प्रशिक्षक बेव्ह प्रिस्टमन यांनी कॅनडाला 2021 मध्ये टोकियो येथे ऑलिम्पिक विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यांना आधीच राष्ट्रीय फुटबॉल महासंघाने निलंबित केले होते. त्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेतून त्यांना हटविण्यात आले होते.
प्रिस्टमन आणि त्यांचे दोन साहाय्यक, जोसेफ लोम्बार्डी आणि जास्मिन मँडर या प्रकरणात अडकलेले आहेत. त्यांच्यावर आता एका वर्षासाठी फुटबॉलच्या सर्व प्रकारांत सहभागी होण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ‘फिफा’ने आपल्या अपील न्यायाधीशांना प्रकरण हाताळण्यास सांगून स्वत:ची शिस्तभंग कारवाई प्रक्रिया जलदगतीने केली. ‘फिफा’ न्यायाधीशांना प्रिस्टमन आणि त्यांचे दोन साहाय्यक आक्षेपार्ह वर्तन आणि निष्पक्ष खेळाच्या तत्त्वांचे उल्लंघन यासंदर्भात दोषी आढळले आहेत.
कॅनेडियन महासंघाला त्यांचे कर्मचारी स्पर्धेच्या नियमांचे पालन करतील याची खात्री न केल्याबद्दल जबाबदार धरण्यात आले आहे. प्रशिक्षक आणि कॅनेडियन महासंघ आता पॅरिसमधील विशेष ऑलिम्पिक न्यायालयाच्या लवादासमोर त्यांच्यावरील निर्बंधांना आव्हान देऊ शकतील. 38 वर्षीय प्रिस्टमन या इंग्लंडच्या असून त्यांना 2020 मध्ये कॅनडा संघाच्या प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. 2027 च्या महिला विश्वचषकापर्यंत त्यांचा करार आहे.