सावकार संतोषच्या मृत्यू प्रकरणाला कलाटणी
फेसबुक फ्रेंडच्या साथीने केला पतीचा खून : मुलीच्या फिर्यादीवऊन पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल
बेळगाव : खासगी सावकारी व रिअल इस्टेट व्यवसाय करणाऱ्या संतोष दुंडाप्पा पद्मण्णावर (वय 46) रा. अंजनेयनगर याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला कलाटणी मिळाली असून आपल्या फेसबुक फ्रेंडच्या मदतीने त्याच्या पत्नीने त्याचा खून केल्यासंबंधी माळमारुती पोलीस स्थानकात पाच जणांवर एफआयआर दाखल झाला आहे. बुधवारी न्यायालयाची परवानगी घेऊन संतोषचा दफन केलेला मृतदेह उकरून काढून उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. संतोषची मुलगी संजना हिने दिलेल्या फिर्यादीवरून त्याची पत्नी उमा, तिचा फेसबुक फ्रेंड शोभित गौडा, कामगार नंदा कुरिया, प्रकाश कुरिया व एक अनोळखी अशा एकूण पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, मुलीने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदाशिवनगर येथील लिंगायत स्मशानभूमी येथे दफन करण्यात आलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी श्रवणकुमार, एफएसएलचे पथक स्मशानभूमीत उपस्थित होते. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्या उपस्थितीत मृतदेह उकरून काढून उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी स्मशानभूमीतही बघ्यांची गर्दी झाली होती. पोलिसांनी गर्दी हटवून केवळ उत्तरीय तपासणी करणारे डॉक्टर, एफएसएल पथक व संतोषच्या कुटुंबीयांना प्रवेश देण्यात आला होता. कौटुंबिक वादातून सहा महिन्यांपूर्वी संतोष व उमा यांच्यात भांडण झाले होते. शोभित गौडा या फेसबुक फ्रेंडशी उमाची मैत्री वाढल्यामुळे संतोषने आपल्या पत्नीला समज दिली होती. तेव्हापासून घरात भांडण सुरू झाले होते. या भांडणानंतर 9 ऑक्टोबर रोजी गूढरीत्या त्याचा मृत्यू झाला आहे. शिक्षणासाठी बेंगळुरात असणारी मुलगी संजना बेळगावला परतल्यानंतर या प्रकरणातील गूढ उकलण्यास सुरुवात झाली.
सीसीटीव्हीचे फुटेज केले डिलिट
संजना वडिलांच्या अंत्यविधीसाठी बेळगावला आली. यावेळी स्मशानातून आल्यानंतर थेट तिने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यावेळी आई उमाने याला आक्षेप घेतला. आता तर स्मशानातून आली आहेस, आधी आंघोळ कर, नंतर फुटेज पाहू, असे सांगितले. संजना आंघोळ करून येईपर्यंत सीसीटीव्हीचे फुटेज डिलिट करण्यात आले होते. तिने आपल्या भावांना विचारले, त्यावेळी त्यांनी आईचे नाव सांगितले. संशय बळावून संजनाने पोलिसात फिर्याद दिल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.