For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आयपीएल’च्या रिंगणात पैशांचा धूर!

07:00 AM Mar 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘आयपीएल’च्या रिंगणात पैशांचा धूर
Advertisement

‘इंडियन प्रीमियर लीग’ म्हणजे क्रीडा शौकिनांची तुफान गर्दी, चुरशीचे सामने व जबरदस्त ग्लॅमर एवढचं नव्हे...डोकं गरगरून सोडणारं अर्थकारण ही  देखील त्याची खासियत...‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर’ व ‘राजस्थान रॉयल्स’ या संघांची मालकी मिळविताना केलेले अगडबंब व्यवहार हे त्याला पुरेपूर जागणारे व ‘आयपीएल’चं महत्त्व दाखवून देणारे...

Advertisement

इंडियन प्रीमियर लीग’ (आयपीएल) दिवसेंदिवस वरच्या दिशेनं झेपावतेय हे वेगळं सांगण्याची गरज आता राहिलेली नाहीये...याचं ताजं उदाहरण म्हणजे ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर’ (आरसीबी) व ‘राजस्थान रॉयल्स’ (आरआर)...‘आदित्य बिर्ला समूह’, ‘टाईम्स ऑफ इंडिया समूह’ (टीओआय), ‘बोल्ट व्हेंचर्स’ आणि ‘ब्लॅकस्टोन’ यांनी ‘आरसीबी’चा खिशात घातलाय तो 100 टक्के हिस्सा...सध्या पुरुषांची ‘आयपीएल’ अन् महिलांची ‘वुमन्स प्रीमियर लीग’ (डब्ल्यूपीएल) ही दोन्ही जेतेपदं आहेत ती ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर’च्याच मुठीत...वरील सर्व समूहांनी ‘डियाजियो’ची उपकंपनी ‘युनायटेड स्पिरीट्स लिमिटेड’च्या झोळीत ओतलेत तब्बल 1.78 अब्ज डॉलर्स वा सुमारे 16 हजार 600 कोटी रुपये...

यंदाची ‘इंडियन प्रीमियर लीग’ संपल्यानंतर नवीन ‘मालकी हक्क रचना’ लागू होईल...‘आदित्य बिर्ला समूहा’चे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांचे पुत्र व संचालक आर्यमन विक्रम बिर्ला यांची ‘आरसीबी’चे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलीय, तर ‘टीओआय’चे उपाध्यक्ष सत्यन गजवानी यांना उपाध्यक्षपद देण्यात आलंय...आर्यमन यांनी यापूर्वी मध्यप्रदेशचं रणजी करंडक स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेलं असून ‘आयपीएल’मधील राजस्थान रॉयल्स संघात सुद्धा त्यांचा समावेश होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ‘इंडियन म्रीमियर लीग’ला प्रारंभ झाला तो 2008 साली. त्यावर्षी विजय मल्या यांच्या ‘युनायटेड स्पिरीट्स’नं संघाचे मालकी हक्क काबिज केले होते ते 111.6 दशलक्ष डॉलर्स वा 485 कोटी रुपयांच्या साहाय्यानं. त्यानंतर 2023 मध्ये ‘आरसीबी’नं ‘डब्ल्यूपीएल’ संघावर वर्चस्व मिळविलं ते 901 कोटी रुपये ओतून...

Advertisement

वर्ष 2024...‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर’नं महिलांची पहिलीवहिली ‘वुमन्स प्रीमियर लीग’ जिंकली अन् त्यानंतर 2025 मध्ये ‘आयपीएल’चं जेतेपद सुद्धा मिळविलं ते पहिल्यांदाच. दोन्ही किताब स्वत:च्या खात्यात जमा केलेला तो एकमेव संघ...‘इंडियन प्रीमियर लीग’च्या इतिहासात आता सर्वांत महाग संघ म्हणून मान मिळविलाय तो ‘आरसीबी’नं. हिस्सा घेण्याच्या शर्यतीत ‘सिरम इन्स्टिट्यूट’चे अदार पुनावाला, ‘मणिपाल हॉस्पिटल’चे रंजन पै, खासगी इक्विटी कंपन्या ‘इक्यूटी’, ‘टीपीजी’ नि ‘तेमासेक’ तसंच ‘इंग्लिश प्रीमियर लीग’मधील विश्वविख्यात क्लब ‘मँचेस्टर युनायटेड’ची मालकी असलेलं ग्लेझर कुटुंब देखील उतरलं होतं...

या व्यवहारानंतर कुमारमंगलम बिर्ला यांनी म्हटलंय, ‘गेल्या दोन दशकांत ‘आयपीएल’ बनलीय खेळांच्या विश्वातील ‘वैश्विक पॉवरहाऊस’. तिनं भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा अक्षरश: बदलून टाकलाय व भारताची मान जगभरात ताठ केलीय’...‘आरसीबी हा ‘इंडियन प्रीमियर लीग’मधील सर्वांत लोकप्रिय ब्रँड असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये. आम्हाला संघाचं रुपांतर वैश्विक क्रीडासंस्थेत करायचंय’, ‘टाईम्स इंटरनेट लिमिटेड’चे अध्यक्ष सत्यन गजवानी यांचे शब्द...‘बोल्ट व्हेंचर्स’चे डेव्हिड ब्लिट्झर यांनी ‘आरसीबी’च्या वृद्धीचं वर्णन ‘अद्भूत’ शब्दाच्या साहाय्यानं केलंय. त्यांनी जगभरातील विविध क्लबांत गुंतवणूक केलेली असून ‘रॉयल चॅलेंजर्स’मध्ये पैसे ओतण्याची मिळालेली संधी ही फार मोठी असल्याचं नमूद केलंय...

‘बीएक्सपीई’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विरल पटेल यांनी म्हटलंय, ‘ब्लॅकस्टोननं नेहमीच विचार केलाय तो भारताचा. ‘आरसीबी’ विश्वातील एक सर्वांत लोकप्रिय संघ असून विराट कोहली, ख्रिस गेल, ए. बी. डीव्हिलियर्स, शेन वॉटसन, अनिल कुंबळे, ग्लेन मॅक्सवेल, युवराज सिंग व फाफ डू प्लेसिससारख्या दिग्गजांनी त्यांचं प्रतिनिधीत्व केलंय ही आमच्यासाठी अभिमानाची बाब’...2013 साली ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर’चा कर्णधार बनला तो विराट कोहली आणि त्यानंतर संघाची लोकप्रियता झपाट्यानं वाढली. विराटकडे पुढं भारताचं देखील नेतृत्व चालून आलं. 2025 मध्ये ‘ब्लेंड फायनान्स’नं मूल्यांकनाच्या बाबतीत ‘मुंबई इंडियन्स’ला प्रथम, तर ‘आरसीबी’ला दुसरं स्थान दिलं होतं. तिसरा क्रमांक पटकावला होता तो ‘चेन्नई’नं...

दरम्यान, ‘राजस्थान रॉयल्स’ची खरेदी केलीय ती अमेरिकेतील भारतीय वंशाचे उद्योगपती काल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील समूहानं. त्यांना त्यासाठी ओतावे लागलेत 1.63 अब्ज डॉलर्स वा 15 हजार 240 कोटी रुपये...2008 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ‘राजस्थान’ची खरेदी केली होती ती इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले भारतीय उद्योगपती मनोज बेदाळे यांनी. त्यांना त्यासाठी 6.7 कोटी डॉलर्स म्हणजेच 268 कोटी रुपये मोजावे लागले. त्यावेळी रुपयाची किंमत होती प्रति डॉलर 40. आता 18 वर्षांच्या कालावधीनंतर डॉलरचा विचार केल्यास मूल्य तब्बल 24 पटींनी वाढलंय, तर रुपयाच्या बाबतीत चक्क 57 पटींनी...

‘राजस्थान रॉयल्स’ विकत घेणाऱ्या समूहात समावेश आहे तो जगातील सर्वांत मोठा किराणा समूह ‘वॉलमार्ट’चे रॉब वॉल्टन यांचा. अमेरिकेच्या व्यावसायिक फुटबॉल लीगमध्ये (नॅशनल फुटबॉल लीग) खेळणारा ‘डेन्व्हर ब्राँकॉस’ हा त्यांचाच संघ...खेरीज अंतर्भाव आहे तो ‘फोर्ड मोटार’ कंपनीच्या कुटुंबातील शीला फोर्ड हेम्प (‘एनएफएल’मधील ‘डेट्रॉईट लायन्स क्लब’च्या मालकीण) यांचाही...सोमानी यांनी म्हटलंय, ‘या व्यवहारात फार मोठी क्षमता असून ‘इंडियन प्रीमियर लीग’च्या भविष्यासंबंधी आम्ही उत्साहित आहोत’...2008 साली ‘बीसीसीआय’नं ज्या आठ संघांची निवड केली होती त्यात समावेश होता तो ‘राजस्थान रॉयल्स’चा. ऑस्ट्रेलियाचे दिवंगत महान लेगस्पीनर शेन वॉर्न यांच्या नेतृत्वाखालील संघानं पहिल्याच वर्षी जेतेपद मिळविलं. त्यानंतर त्यांना पुन्हा अशी कामगिरी करता आलेली नाहीये!

- राजू प्रभू (raju.prabhu6@gmail.com))

Advertisement
Tags :

.